पिंपरी-चिंचवडमध्ये सावत्र वडिलांनीच आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सावत्र वडिलांवर बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथकं तयार करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडील रिक्षाचालक असून त्याने आपल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या केली. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे पीडित मयत अल्पवयीन मुलगी, लहान बहीण, आई आणि सावत्र वडील गेल्या दोन महिन्यांपासून एकत्र राहत होते. दरम्यान, आरोपी सावत्र वडिलांना दोन्ही मुलींवर प्रेम प्रकरण असल्याचा संशय होता. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. तसेच पत्नीसोबतही वाद होत असत.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मयत १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि सावत्र वडील दोघेच घरात होते. तेव्हा, त्यांच्यात वाद झाला आणि यातूनच मुलीवर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केले असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्याने मुलीचे तोंड दाबून आणि हाताने गळा दाबून हत्या केली. यानंतर आरोपी फरार झाला आहे. मयत मुलीची मोठी बहीण घरी आली तेव्हा घराच्या दरवाजाला कुलूप होते. तिने थोडावेळ वाट पाहून कुलूप तोडले तेव्हा ही खळबळजनक घटना समोर आली. फरार आरोपी बापाचा शोध घेण्यासाठी भोसरी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.