महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशनचे (एमफुक्टो) अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संघटनेने त्यांचा राजीनामा घेतला असून नगरच्या प्रेमचंद सारडा कॉलेजचे प्राचार्य ए. टी. सानप यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अंमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या कारभारात २००१ ते २००९ या कालावधीत साधारण ३३ लाख रूपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून संस्थेचे तत्कालीन सचिव आणि एमफुक्टो या संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पाश्र्वभूमीवर पाटील यांना अध्यक्षपदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. संघटनेच्या कार्यकारिणीच्या शनिवारी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. याबाबत नगर येथे झालेल्या आयफुक्टोच्या मेळाव्यामध्ये रविवारी घोषणा करण्यात आली.