शर्ट आणि पॅन्टच्या टॅगवरून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांचा शोध घेऊन पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. अवघ्या ५०० रुपयांसाठी या तीन अल्पवयीन मुलांनी एका वाटसरु व्यक्तीचा खून केला. हे तिघेही हैदराबाद येथील असून मुंबईला जाऊन गुन्हेगारी क्षेत्रातील भाई बनण्याची त्यांची इच्छा होती, असं त्यांनी पोलिसांसमोर कबूल केलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने या मुलांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दत्तात्रय कृष्णाजी माचर्ला (वय ४१) या व्यक्तीचा तीन अल्पवयीन मुलांनी खून केला. हे तिघेही हैद्राबाद येथून मुंबईकडे भाई बनण्याच्या उद्देशाने चालत निघाले होते. रस्त्यात त्यांना दत्तात्रय भेटले दरम्यान अवघ्या पाचशे रुपयांसाठी त्यांनी दत्तात्रय यांचा खून केला. याची कबुली या अल्पवयीन मुलांनी पोलिसांसमोर दिली आहे. गेल्या आठवड्यात देहूरोड परिसरात दत्तात्रय माचर्ला यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता. या घटनेचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या युनिट-५ च्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

मृत व्यक्तीची अशी पटवली ओळख

दत्तात्रय यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या खिशात ओळखपत्र किंवा मोबाईल नव्हता. त्यामुळे इतर काहीतरी पुरावा मिळवण्याच्या उद्देशाने सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या दृष्टीस त्यांच्या शर्टची कॉलर आणि पॅन्टचा टॅग पडला. हे दोन्ही एकाच नावाने होते. प्रिन्स टेलर BWD असा टॅगवर उल्लेख असल्याने त्याचा नेमका अर्थ काय होतो? याचा शोध पोलिसांनी घेतला. तेव्हा BWD चा अर्थ हा भिवंडी असल्याचं त्यांना समजलं. पोलिसांनी तातडीने भिवंडी शहरात जाऊन प्रिन्स नावाच्या टेलर्सचा शोध घेतला. शहरात त्याच नावाचे २५ टेलर्स असल्याचे समोर आले. जिथे मयत व्यक्तीने कपडे शिवले होते त्याचा अचूक शोध पोलिसांनी लावला. त्या टेलरकडून त्यांच्या कुटुंबाचा पत्ता पोलिसांनी मिळवला. कुटुंबियांकडून मृत दत्तात्रय यांचा मोबाईल नंबर मिळवत तांत्रिक बाबी तपासून आरोपीपर्यँत गुन्हे शाखा युनिट-५ चे अधिकारी पोहचले.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

लॉकडाउनपूर्वी मृत दत्तात्रय हे भिवंडीवरून सोलापूरला नातेवाईकाकडे गेले होते. मात्र, त्यानंतर लॉकडाउन लागल्याने पत्नी आणि मुलांची आठवण येत असल्याने सोलापूर येथून भिवंडीला ते चालत निघाले होते. तेव्हा, तीन अल्पवयीन आरोपी आणि अनोळखी दत्तात्रय हे निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात भेटले. तिघांनी दत्तात्रय यांना पैसे मागितले. मात्र, त्यांच्याकडेच पैसे नव्हते. अल्पवयीन तिघांपैकी एकजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्यांने इतर साथिदारांना दत्तात्रय यांचा पाठलाग करू आणि मध्यरात्री झोपण्याची वाट पाहू असं सांगितले.

दत्तात्रय हे रस्त्यात रात्रीच्यावेळी झोपी जाताच त्यांच्या डोक्यात दगड घालून तिघांनी खून केला. खिशातील ५०० रुपये आणि मोबाईल घेऊन हे तिघेही पसार झाले. या कटकारस्थानातील मुख्य सूत्रधार अल्पवयीन हा मुंबईमधील बालसुधारगृहात होता. त्यानंतर त्याची हैद्राबाद येथे रवानगी करण्यात आली. त्याठिकाणी इतर दोघांशी त्याची ओळख झाली. मुंबईमध्ये जाऊन भाई बनू असे म्हणून तिघेजण मुंबईला चालत निघाले होते, असे त्यांनी पोलिसांसमोर कबूल केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांच्या पथकाने खून प्रकरणाचा छडा लावण्याचे काम केले.