पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसाने एका टेम्पो चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वाकड येथील भूमकर चौकातील आहे. शनिवारी, ३ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाची चुक असून त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली.

पोलीस हवालदार डी. एस. ढावरे हे हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. शनिवारी ते वाकड येथील भूमकर चौकात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अवसर मोल हे वार्डन होते. वर्दळीच्यावेळी वाहतुकीचे नियम डावलून टेम्पो चालक भूमकर चौकातील पुलाखालून सिग्नल तोडून जात होता. त्यावेळी वार्डन मोल यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू, न थांबता टेम्पो चालकाने थेट वार्डनच्या अंगावर टेम्पो घातला, यात वॉर्डन १० फूट फरफटत गेला, यात वॉर्डन जखमी झाला आहे.

टेम्पो चालकाला कसबसे थांबवण्यात आले मात्र, वाहतूक पोलीस हवालदार डी. एस. ढावरे यांना राग अनावर न झाल्याने त्यांनी टेम्पो चालकाला खाली खेचले आणि बेदम मारहाण केली. वाहतूक कोंडी झाल्याने गुन्हा किंवा तक्रार देऊ शकलो नाहीत. मात्र, सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधीत टेम्पो चालकावर लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली आहे.

या सर्व घटनेचा विडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ आता सर्वत्र व्हयरल होत आहे. मात्र, ज्या पद्धतीने वाहतूक पोलीस हवालदार ढावरे यांनी टेम्पो चालकाला मारहाण केली. त्यामुळे सोशल मीडियावर टीका टिप्पणीद्वारे वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.