पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या छिंदम प्रकरणाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटल्यानंतर पुन्हा एकदा तसाच प्रकार पुण्यात समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याचा व्हिडीओ एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला असून पोलिसांनी या ग्रुपच्या अॅडमिनला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पुण्यातील समर्थ आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला त्या ग्रुपच्या अडमिनला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ज्या व्यक्तीने हे विधान केले आहे त्याचा शोध घेतला जात आहे.

शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माजी नगरसेवक अनिस सुंडके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा हसीना इनामदार यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलल्याचा व्हिडिओ आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ समर्थ पोलीस स्टेशन आणि कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या ठिकाणी त्यांनी याप्रकाराविरोधात तक्रार दिली असून याप्रकरणी ग्रुप अडमिनला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे.