पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील एक महिला प्रातविधीसाठी घराबाहेर गेली असता बळजबरी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलने विरोध केला असता आरोपी तरुणाने महिलेचा एक डोळा काढला आणि नंतर दुसरा डोळा निकामी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात ३० वर्षीय व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एक महिला घरापासून काही अंतरावर प्रातविधीसाठी गेली होती. तेथील झाडीमध्ये एक तरुण लपलेला होता. महिला आतमध्ये जाताच तिथे कोणी तरी असल्याचे जाणवले. तुला आई-बहिण नाही का, असा जाब तिने विचारला. त्याच दरम्यान तरूणाने त्या महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आरोपी तरुणाने महिलेस मारहाण आणि जवळील वस्तुने डोळ्यावर वार केला. पीडित महिलेच्या आवाजामुळे आजुबाजूचे नागरिक येत असल्याचे दिसताच आरोपीने तेथून पळ काढला. हल्ल्यात महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. महिलला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबधित आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असून आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिरुर पोलिसांनी सांगितले.