20 January 2019

News Flash

नव्या वर्षांत आधारला गती

टपाल कार्यालयांत ४१ आधार केंद्र सुरू होणार

(प्रतिकात्मक छायाचित्र )

टपाल कार्यालयांत ४१ आधार केंद्र सुरू होणार

नव्याने आधार नोंदणी, आधारमधील दुरुस्तीसाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागत असताना नव्या वर्षांत या त्रासापासून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. आधार नोंदणी केंद्रांची अपुरी संख्या लक्षात घेऊन शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये नव्याने ४१ केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये नव्याने आधार नोंदणी करण्याबरोबरच आधार कार्डमधील दुरुस्तीही करता येणार आहे. त्यामुळे आधार नोंदणीला गती मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार मोबाइल सीमकार्ड, बँक खाते, बँकांच्या माध्यमातून होणारे विविध व्यवहार, प्राप्तिकर विवरण, शाळा आणि महाविद्यालय तसेच रुग्णालये अशा सर्वच ठिकाणी आधार कार्डाची जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नव्याने नोंदणी करताना नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले होते. आधार केंद्रांची अपुरी संख्या, प्रशिक्षित यंत्रचालकांच्या अभावामुळे आधार केंद्रांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यातच जिल्हा प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करूनही आधार केंद्र दुरुस्ती करण्यासाठी मान्यता मिळत नव्हती. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात मोठी भर पडली होती. मात्र नव्या वर्षांत आता आधार केंद्रांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूला बँकांमध्येही आधार केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच पोस्ट ऑफिसातही ४१ केंद्र सुरू होणार आहेत.

शहरातील आधार केंद्रांच्या अपुऱ्या संख्येच्या पाश्र्वभूमीवर खासदार अनिल शिरोळे यांनी या संदर्भात केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्याशी शिरोळे यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यावर पोस्ट ऑफिसात आधार केंद्र सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन असून राज्यांकडून त्याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. पोस्टाच्या ४१ कार्यालयांत ही सुविधा काही दिवसांत सुरू करण्याचे नियोजन आहे, असे पत्र केंद्र सरकारकडून त्यांना देण्यात आले आहे.

शहरातील पोस्ट ऑफिसात आधार नोंदणी आणि दुरुस्ती केंद्र येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येतील. त्यासाठी शासन स्तरावरही सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार पोस्ट ऑफिसात केंद्रे तत्काळ सुरू होणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल शिरोळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

First Published on January 3, 2018 3:22 am

Web Title: aadhaar card centers in postal office