जिल्हा प्रशासनाला ‘यूआयडीएआय’कडून ५० यंत्रे मिळणार

पुढील आठवडय़ापासून केवळ आधार कार्डमधील दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी अपडेट क्लायंट लाइफ किट (यूसीएल) वापरण्याकरिता जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ही ५० यंत्रे दोनतीन दिवसांत भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडीएआय) जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहेत. ही सर्व यंत्रे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बसवण्यात येणार आहेत. या यंत्रांद्वारे केवळ एका बोटाच्या ठशावरून पाच मिनिटांत आधार कार्डमधील दुरुस्ती करण्यात येणार आहे.

गेल्या चार महिन्यांपासून आधार केंद्रांचा गोंधळ सुरू झाल्यामुळे आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहर आणि जिल्ह्य़ातील आधार केंद्रांवर येणारे बहुतांश नागरिक आधार कार्डात जन्म दिनांक, मोबाइल क्रमांक, निवास पत्ता, छायाचित्र याबाबत दुरुस्ती करण्यासाठी गर्दी करत आहेत. एका आधार यंत्रावर एका व्यक्तीची आधार नोंदणी किंवा दुरुस्तीचे काम करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो.  त्यानुसार सकाळी दहा ते सहा या वेळेा केवळ २० ते २५ आधारची कामे होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आधार दुरुस्तीकरिता यूआयडीएआयकडे यूसीएल यंत्रांची मागणी प्रस्ताव पाठवून केली होती. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून ५० यूसीएल यंत्र तीन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे येणार आहेत. या यंत्रांद्वारे एका बोटाचा ठसा घेऊन पाच मिनिटांमध्ये दुरुस्ती करता येते. एका यंत्राद्वारे प्रतिदिन ७० ते ८० आधार दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुब्बुळांचे स्कॅनिंग होत नसल्यास संबंधित नागरिकांची नोंद करून त्याबाबतची पावती यूआयडीएआयकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आधारचे नोडल अधिकारी आणि तहसीलदार विकास भालेराव यांनी दिली.

यूसीएल डिव्हाइस काय आहे?

अपडेट क्लायंट लाइफ (यूसीएल किट) हे एक बायोमॅट्रिक डिव्हाइस आहे. या डिव्हाइसला लॅपटॉप आणि प्रिंटर जोडावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास यूसीएल यंत्र येणार असून महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पाच यंत्र बसविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. आधारची दुरुस्ती करताना छायाचित्राचे ओळखपत्र व पत्ता पुरावा आवश्यक आहे.