अपंग, वृद्ध, आजारी नागरिकांना विविध कामांमध्ये अडथळे; मोबाइल व्हॅनची घोषणा हवेतच विरली

शासकीय आणि खासगी जवळपास सर्वच बाबींमध्ये आधार कार्डची सक्ती करण्यात आली असल्याने नव्याने आधार कार्ड काढण्यासाठी कायमची केंद्र नसल्याने शिबिरांचा उपाय करण्यात येत आहे. दुसरीकडे काही ठिकाणी आधार कार्ड अद्ययावत करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या सर्व प्रकारांमध्ये आजार, अपंगत्व आणि वृद्धत्वामुळे घराबाहेरच पडू न शकणारा घटना पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे. त्यांना आधार कार्ड देण्याचा विचारही होत नाही. दोन वर्षांपूर्वी अशा घटकांसाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, ती हवेतच विरली.

शासकीय विविध योजना आणि कामे, बँक खाती, मोबाइल आदी सर्व बाबींसाठी सध्या आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर मृत्यूच्या दाखल्यावरही आधार कार्डच्या क्रमांकाचा उल्लेख आवश्यक करण्यात येत आहे. सध्या शहरात पूर्ण वेळ आधार कार्ड मिळण्याचे कोणतेही केंद्र नाही. शहरात आधार कार्डची केंद्रे स्थापन करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मागेच शासन दरबारी पाठवला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात आधार कार्ड काढण्यासाठी दोनतीन दिवसांची शिबिरे घेण्यात येत आहेत.

आधार कार्डची माहिती अद्ययावत करण्याच्या दृष्टीने शहरात काही ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणीही नागरिकांनी गर्दी होते आहे. या सर्व बाबींमध्ये घराबाहेर पडू न शकणाऱ्या मंडळींचा कोणताही विचार झालेला नाही.

काहींकडे जुनी आधार कार्ड आहेत. ती स्वीकारली जात नसल्याने त्यांना अद्ययावत करणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे काहींकडे आधार कार्डच नाही. अनेक मंडळींना विकारांमुळे चालता येत नाही. काही जण वृद्धत्वामुळे घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यांना आधार देण्याबाबत सध्या कोणतीच योजना नाही. त्यामुळे या मंडळींना विविध कामांसाठी अडथळे येत आहेत.

तीन वर्षांपासून घराबाहेर नाही!

एरंडवणे येथील एक महिला कंबरेच्या विकारामुळे मागील तीन वर्षांपासून घरात पडून आहेत. कोणत्याही स्थितीत त्या घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यांच्याकडे जुने आधार कार्ड असले, तरी त्याचे अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्यामुळे कार्ड असूनही त्यांना प्राप्तिकर विवरणपत्रे भरणे शक्य होत नाही. इतर कामेही अडून पडली आहेत. सजग नागरिक  मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर याबाबत म्हणाले, की आधार कार्ड असलेली आणि ते अद्ययावत करणे आवश्यक असणारी तसेच आधार कार्डच नसणारी अशी अनेक मंडळी शहरात आहेत. त्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड काढण्यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ती अद्यापही प्रत्यक्षात आली नाही किंवा त्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली नाहीत.