येत्या ८ दिवसांत पिंपरी चिंचवडमध्येही केंद्र सुरू होणार; यूसीएल यंत्रे चाचणी स्तरावर सुरू

आधार कार्डमध्ये केवळ दुरूस्ती करण्याकरिता असलेली यंत्रणा शहरात कार्यान्वित करण्यात आली आहे. दुरूस्तीसाठी अपडेट क्लायंट लाइफ किट (यूसीएल) पुणे महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यरत करण्यात आली आहेत. ही यूसीएल यंत्रे चाचणी स्तरावर सुरू करण्यात आली असून येत्या आठ दिवसांत पिंपरी चिंचवडसह जिल्ह्य़ात आणखी काही ठिकाणी ती सुरू करण्यात येणार आहेत.

शहर व जिल्ह्य़ातील ९५ टक्के आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून आधार केंद्रांचा गोंधळ सुरू झाल्यामुळे आधार नोंदणी आणि दुरूस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहर आणि जिल्ह्य़ातील आधार केंद्रांवर बहुतांश नागरिकांच्या आधार कार्डात जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, निवास पत्ता, ईमेल आयडी, लिंग यांबाबतची दुरुस्ती करण्यासाठी गर्दी होत आहे. एका आधार यंत्रावर एका व्यक्तीची आधार नोंदणी किंवा दुरूस्तीचे काम करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे नीट न आल्यास हाच कालावधी तीस मिनिटांपर्यंत वाढतो. त्यानुसार सकाळी दहा ते सहा या वेळेत केवळ वीस ते पंचवीस आधारची कामे होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने केवळ आधार दुरूस्तीकरिता विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (युआयडीएआय) यूसीएल किटची मागणी प्रस्ताव पाठवून केली होती. त्यानुसार गेल्या आठवडय़ात यूआयडीएआयकडून जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात किट आली आहेत. सर्व किट महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बसविण्यात येणार आहेत. या किटद्वारे केवळ एका बोटाच्या ठशावरून काही मिनिटांत आधार दुरूस्ती करण्यात येत आहे.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात यूसीएलची निविदा काढण्यात आली. त्यानुसार किट प्राप्त झाले आहेत. सध्या पुणे महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सात यूसीएल किट कार्यरत करण्यात आले असून ते चाचणी स्तरावर आहेत. यूआयडीएआयच्या पोर्टलच्या काही समस्या असल्याने आधार दुरूस्तीच्या कामांसाठी वेळ लागत असून प्रतिदिवस तीस आधार दुरूस्त्या होत आहेत. येत्या आठ दिवसांत पुणे महापालिकेच्या उर्वरित सर्व आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये यूसीएल कीट कार्यरत होतील, अशी माहिती आधार समन्वयक अधिकारी मनोज जाधव यांनी गुरूवारी दिली.

या किटद्वारे केवळ एका बोटाचा ठसा घेऊन आधार कार्डमधील दुरूस्ती प्रतिदिन सत्तर ते ऐंशीपर्यंत करणे आता शक्य होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या हातांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅनिंग होत नसल्यास संबंधित नागरिकांची नोंद करून त्याबाबतची पावती यूआयडीएआयकडे पाठविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणून संबंधितांना आधारकार्ड मिळू शकेल, असेही जाधव यांनी सांगितले.

आधार दुरूस्तीसाठीची यंत्रणा या ठिकाणी

वारजे क्षेत्रीय कार्यालय, रामवाडी (नगर रस्ता), हडपसर, धनकवडी, टिळक रस्ता, कोंढवा खुर्द अशा सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये यूसीएल किट कार्यरत करण्यात आली आहेत. यांपैकी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात दोन यूसीएल किट आहेत. यूसीएल किटद्वारे आधार कार्डवरील नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल, जन्मतारीख, लिंग यांमध्ये काही दुरूस्ती असल्यास तशी दुरूस्ती करण्यात येत आहे.