पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतील यूसीएल किट कार्यान्वित करण्यात अडचणी

आधार यंत्रे आणि अपडेट क्लायंट लाइफ (युसीएल) किटमधील प्रिंटर, लॅपटॉप यांसारख्या नादुरूस्त किंवा कमी असलेल्या उपकरणांमुळे पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील यूसीएल किट कार्यान्वित करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे किटमधील कमी असलेल्या उपकरणांची पूर्तता करण्यासाठी पुणे महापालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून आधार केंद्रांचा गोंधळ सुरू झाल्यामुळे आधार नोंदणी आणि दुरूस्तीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहर आणि जिल्ह्य़ातील आधार केंद्रांवर बहुतांश नागरिकांच्या आधार कार्डात जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, निवास पत्ता, ईमेल आयडी, लिंग यांबाबत दुरुस्ती करण्यासाठीच गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने केवळ आधार दुरूस्तीकरिता विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (युआयडीएआय) युसीएल किटची मागणी प्रस्ताव पाठवून केली होती. त्यानुसार हे युसीएल किीट महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहेत. सध्या पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सहा ठिकाणी सात युसीएल किट कार्यरत करण्यात आले आहेत. ही संख्या अपुरी असून युसीएल किट वाढविण्याची नितांत गरज आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पुणे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

आधार नोंदणी आणि दुरूस्तीच्या किटमधील काही उपकरणे नादुरूस्त असल्याने दुरूस्त आधार यंत्रे आणि युसीएल किट पूर्ण क्षमतेने वापरता येत नसल्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून नादुरूस्त उपकरणांबाबत महाऑनलाइनकडून विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. त्यानंतर प्रस्तावाला मान्यता मिळाली किंवा कसे, याबाबतची माहिती प्राधिकरणाकडून महाऑनलाइनकडे आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनाला दिली जाते. याकरिता लागणारा कालावधी लक्षात घेता पुणे महापालिकने उपकरणे विकत घेण्याची किंवा पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. आवश्यकतेनुसार प्रिंटर, लॅपटॉप यांसारखी उपकरणे महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून दुरूस्त पंधरा आधार यंत्रे आणि युसीएल किट महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यान्वित होऊ शकणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी देण्यात आली.

केवळ १३३ आधार केंद्रे

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात अनुक्रमे १२५ आणि ७० अशी एकूण १९५ आधार केंद्रांची गरज असताना सोमवारअखेपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या कार्यक्षेत्रात मिळून एकूण फक्त ७० आधार केंद्रे सुरू आहेत. त्यातील दहा केंद्रे तात्पुरत्या स्वरूपाची असून उर्वरित ६० केंद्रे कायमस्वरूपी आहेत, तर जिल्ह्य़ात मिळून एकूण केवळ १३३ आधार केंद्रे सुरू आहेत.