24 November 2020

News Flash

निर्दोष आधार यंत्रचालकांना पुन्हा कामे

गेल्या काही महिन्यांपासून आधार केंद्रांवर होणाऱ्या गैरव्यवहारांबाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने येत आहेत.

यंत्रचालकांविरुद्धच्या विविध तक्रारींची जिल्हा प्रशासनाकडून शहानिशा

आधार केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क घेणे, कागदपत्रांची शहानिशा न करता आधार कार्ड देणे किंवा दुरुस्तीची कामे करणे, बनावट बोटांचे ठशे घेऊन गैरव्यवहार करणे, आधार यंत्रांबरोबर फेरफार करणे अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आधार यंत्रचालकांवर जिल्हा प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येत आहे. मात्र, तक्रारींपैकी काही तक्रारी पूर्वग्रहदूषित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता आधार केंद्र किंवा यंत्रचालकांबाबत आलेल्या तक्रारींची शहानिशा करण्यात येणार असून तक्रारीत तथ्य नसल्यास यंत्रचालकांना पुन्हा आधारची कामे देण्यात येणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून आधार केंद्रांवर होणाऱ्या गैरव्यवहारांबाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने येत आहेत. गेल्या तीन महिन्यांत ३३ यंत्रचालक काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. तसेच चार जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शहरासह जिल्ह्य़ातील सर्व आधार यंत्रचालकांची बैठक घेतली. तक्रार केल्यानंतर कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे, अशी तक्रार काही यंत्रचालकांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून याबाबत विशिष्ट ओळख प्राधिकरण (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया -यूआयडीएआय) प्रशासनाकडे मार्गदर्शन मागण्यात आले. त्यावर यूआयडीएआयने केंद्र चालकांबाबत आलेल्या तक्रारींची शहानिशा करावी आणि तक्रारींमध्ये तथ्य न आढळल्यास संबंधितांना पुन्हा कामे देण्यास हरकत नाही, असे कळविले आहे.

त्यामुळे तक्रार प्राप्त झाल्यानंतर काळ्या यादीत टाकलेल्या मात्र, तक्रारीमध्ये तथ्य न आढळलेल्या यंत्रचालकांना पुन्हा आधारची कामे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘सद्य:स्थितीत जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध यंत्रचालकांची संख्या कमी आहे. आधार केंद्रे पूर्ववत होत आहेत. मात्र, तरीदेखील आधार दुरुस्तीच्या कामांसाठी नागरिकांची आधार केंद्रांवर गर्दी होते. त्यामुळे उत्तरे न मिळाल्यास किंवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून केंद्र व यंत्रचालकांविरुद्ध तक्रारी प्राप्त होत आहेत.

त्यामुळे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तक्रारींचे गांभीर्य तपासून त्याबाबत शहानिशा करण्यात येणार असून त्यानंतर कारवाई करायची किंवा कसे? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

तसेच प्राप्त तक्रारींनंतर कारवाई करण्यात आलेल्या संबंधितांनी दाद मागितल्यास तक्रारी तपासण्यात येऊन त्यामध्ये तथ्य न आढळल्यास यंत्रचालकांना पुन्हा आधारची कामे देण्यात येतील’, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी शहर आणि जिल्ह्य़ातील सर्व यंत्रचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक यंत्रचालकांनी तक्रारींची शहानिशा न करता कारवाई करण्यात आली असून आमच्यावर अन्याय झाला आहे, असे सांगितले. त्यामुळे याबाबत यूआयडीएआयकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. यूआयडीएआयने यंत्रचालकांचे पुनर्रिक्षण (रिव्ह्य़ू मेकॅनिझम) करता येऊ शकते. आलेल्या तक्रारींमध्ये तथ्य न आढळल्यास संबंधितांना संधी उपलब्ध करून द्यावी, असे कळविले आहे.

सौरभ राव, जिल्हाधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 4:46 am

Web Title: aadhar mechanics aadhar center
Next Stories
1 शासनाच्या धोरणबदलामुळे नोंदणी, मुद्रांक शुल्क विभागातील सव्‍‌र्हर खरेदी लांबणीवर
2 पुणेकरांना प्रजासत्ताकदिनाचे गिफ्ट; मोफत वाय-फाय सुविधा मिळणार
3 आगामी काळात स्वबळावर लढून मागील निवडणुकीचा सूड घ्यायचाय : संजय राऊत
Just Now!
X