बिगर शेती कर न भरल्यामुळे मंगळवारी सकाळी सहारा इंडिया परिवाराच्या अॅम्बी व्हॅली रिसॉर्टवर करण्यात आलेली कारवाई दुपारी स्थगित करण्यात आली. एकूण थकीत करापैकी एक कोटी रुपये अॅम्बी व्हॅलीकडून भरण्यात आल्यामुळे कारवाई स्थगित करण्यात आली असून, अॅम्बी व्हॅलीच्या प्रवेशद्वाराला आणि तेथील कार्यालयाला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठोकलेले सील काढण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या तहसीलदारांकडून ही कारवाई करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारचा ४ कोटी ८२ लाख रुपयांचा बिगर शेती कर गेल्या अनेक महिन्यांपासून अॅम्बी व्हॅलीच्या व्यवस्थापनाकडून थकविण्यात आला आहे. याबद्दल यापूर्वी वारंवार नोटिसा देऊनही व्यवस्थापनाकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. कर थकविल्यामुळे सरकारने अॅम्बी व्हॅलीचे प्रवेशद्वार आणि स्थानिक कार्यालय मंगळवारी सकाळी सील केले होते. या कारवाईनंतर दुपारी अॅम्बी व्हॅली व्यवस्थापनाकडून वेगाने हालचाली करण्यात आल्या आणि एक कोटी रुपये कराची रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात आली. त्यानंतर ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईबद्दल अॅम्बी व्हॅलीच्या कार्यालयाकडून काहीही माहिती मिळालेली नाही.