श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

आपल्या शरीराची, आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येकजण करू शकतो, पण अनेकदा आपले स्वत:कडेच दुर्लक्ष होते. पुरुष असो अथवा स्त्री, दोघांच्याही बाबतीत आढळणारे हे सत्य कोणीच नाकारू  शकत नाही. त्यातच एखाद्याला आरोग्यविषयक तक्रारीने गाठल्यानंतर, ती तक्रार किंवा समस्या लहान-मोठी कशीही असली तरी सर्वात आधी नैराश्याला सुरुवात होते आणि त्याबरोबरच त्या समस्येचे निराकारण करण्यास सुयोग्य मार्ग सापडण्यातही अडचणी येऊ लागतात. अशा वेळी धावून येतो तो स्वमदत गट. महिलांच्या आयुष्यात येणाऱ्या आरोग्याच्या तक्रारीच्या वेळी ‘आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रूप’ हा स्वमदत गट महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. त्याविषयी..

कर्करोग, कॅन्सर हे शब्द उच्चारताच त्या शब्दांपाठोपाठ नकळतपणे अरे बापरे हे शब्द ओघाने येतातच. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना ग्रासणाऱ्या आणि स्त्री-पुरुष कोणाला या रोगाने ग्रासले आहे, त्यावर त्याचे गांभीर्य आणि काळजी घेण्याचे परिमाण ठरते. महिलांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगामध्ये त्यांच्या विविध तपासण्या सुयोग्य मूल्यात करण्यापासून रुग्णाच्या मनात असणारी भीती, गैरसमज यांचे निराकारण करण्यापासून विविध पातळ्यांवर ‘आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रूप’ चे कार्य चालते.

‘आस्था’ रुग्णाच्या आरोग्याची काळजी घेण्यास त्या महिलेला तर प्रशिक्षित करतेच, पण त्याशिवाय तिला हवा असणारा मानसिक आधारदेखील उपलब्ध करून देते. हा स्वमदत गट सोळा वर्षांपूर्वी डॉ. शेखर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. सध्या डॉ. कुलकर्णींच्याबरोबर डॉ.ओजस वाधवा यांचेही मार्गदर्शन या स्वमदत गटाला मिळत आहे. ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांनींच रुग्णांसाठी चालवलेला हा स्वमदत गट. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मानसिक आधार देणे. आजाराबद्दल योग्य माहिती आणि उपचाराच्या काळात योग्य मार्गदर्शन हा या गटाचा मुख्य हेतू. सर्वसामान्यांमध्ये कर्करोगाबद्दल असणारी भीती आणि गैरसमज दूर करण्याबरोबरच जनजागृती करण्याचे कार्य या गटाच्या माध्यमातून चालते. त्यासाठी व्याख्याने, कार्यशाळा, अनुभवकथन, नाटकाचे प्रयोग, नाटय़वाचन असे विविध कार्यक्रम पुण्यात आणि महाराष्ट्रात इतरत्र अनेक ठिकाणी आयोजित केले जातात. जनजागृतीसाठी ‘हीलिंग हार्मनी’ हा संगीतमय कार्यक्रम ही या स्वमदतगटाची वैशिष्टय़पूर्ण निर्मिती. डॉक्टर आणि रुग्ण यांनी एकत्रितपणे सादर केलेल्या या कार्यक्रमाचे पुण्यात, महाराष्ट्रात आणि परदेशातही शंभरच्या वर प्रयोग झाले आहेत. मागील पाच-सहा वर्षांत सुमारे वीस हजार स्त्रियांची पूर्वतपासणी अशा शिबिरांमधून करण्यात आली आहे.

मागच्या वर्षांत रोटरी क्लब बरोबर मुळशी तालुक्यातल्या एक हजार स्त्रियांची पूर्वतपासणी करण्यात आली असून मार्च महिन्यात पुणे महानगरपालिकेबरोबरच ३ हजार ७०० स्त्रियांची कर्करोग पूूर्वतपासणी करण्यात आली आहे. स्तनांचा, गर्भाशयाच्या मुखाचा, तोंडाचा  कर्करोग, अ‍ॅनिमिया, मधुमेह या सर्व गोष्टींची पूर्वतपासणी या शिबिरात केली जाते. पुण्यात व महाराष्ट्रात कोठेही अशा प्रकारच्या शिबिरांचे  किंवा ‘हीलिंग हार्मनी’ या कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल किंवा स्तनांचा कर्करोग झालेल्या महिलांना समुपदेशन हवे असेल तर गंधाली देसाई यांच्याशी ९०११०६२४१९ या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो. सवलतीच्या दरात मॅमोग्राफीची तपासणी करण्यासाठी तसेच मोफत मॅमोग्राफी करण्यासाठीही या क्रमांकाचा उपयोग होऊ शकतो.

लायन्स क्लब सहकारनगर, लायन्स क्लब सेन्ट्रल आणि आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रूप तर्फे अद्ययावत कर्करोग तपासणी केंद्र जंगली महाराज रस्त्या येथेही सुरू  करण्यात आले आहे. येथे अद्ययावत यंत्रणेमार्फत मॅमोग्राफी करण्यात येते. तसेच इतरही काही आरोग्यचाचणीही येथे होतात. जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचून जनजागृती करणे आणि कर्करोगाचे प्रमाण कमी करणे, सुदृढ-सजग समाजाचे स्वप्न पूर्ण करणे हा आस्था ब्रेस्ट कॅन्सर या स्वमदत गटाचा मुख्य हेतू आहे.