22 April 2019

News Flash

निवडणुकीच्या तोंडावर अभय योजना?

मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी योजना राबविण्याचा प्रस्ताव

मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी योजना राबविण्याचा प्रस्ताव

मिळकतकरापोटीची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना राबविण्यात यावी, असा प्रस्ताव शिवसेनेकडून स्थायी समितीला देण्यात आला आहे. या योजनेमुळे उत्पन्नात वाढ होऊन थकबाकी वसूल होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. आगामी आर्थिक वर्षांसाठी मिळकत करामध्ये १२ टक्के वाढीचा आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळताना थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतला होता. त्यामुळे शिवसेनेचा हा प्रस्ताव मान्य होणार का निवडणुकांच्या तोंडावर अभय योजना मान्य होणार याबाबत उत्सुकता आहे.

मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्त्रोत आहे. चालू वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये (सन २०१८-१९) कर आकारणी आणि करसंकलनातून १ हजार ८०० कोटी रुपये जमा होतील, असा अंदाज होता. मात्र मार्च अखेपर्यंत मिळकतकरातून १ हजार २०० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये किमान ६०० कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर मिळकतकरात बारा टक्के वाढीचा प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांनी ठेवला होता. एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी व्हावी, असे त्यांनी नमूद केले होते. मात्र स्थायी समितीच्या खास सभेत मिळकतकर वाढीचा प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला होता.

मिळकतकरासह विविध विभागांची कोटय़वधी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल केल्यास करवाढ करावी लागणार नाही. त्यामुळे करवाढीसाठी नागरिकांवर बोजा टाकणे योग्य नाही, असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केले होते. थकबाकी वसुलीसाठी प्रभावी यंत्रणा राबवावी, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली होती. मात्र आता शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनकवडे आणि प्रमोद ओसवाल यांनी मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना राबवावी, असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला आहे.

मान्यता मिळण्याची शक्यता

मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी सावध भूमिका भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. मात्र आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अभय योजनेला मान्यता दिली जाईल, अशी शक्यता आहे.

First Published on February 12, 2019 3:07 am

Web Title: abbey scheme in pune