दरमहा महिलांकडून थोडे पैसे गोळा करून बचत करायची, इतक्या छोटय़ा उपक्रमातून अभिनव गटाचा प्रारंभ झाला. एकत्र आलेल्या या महिलांनी हळूहळू ताजी, स्वच्छ भाजी घरोघरी पोहोचवण्याचा व्यवसाय छोटय़ा स्वरुपात सुरू केला. पाहता पाहता हे काम एवढे वाढले, की त्याचे आता एका मोठय़ा व्यवसायात रुपांतर झाले आहे. वीस महिलांपासून सुरु झालेल्या या उपक्रमात आज सात हजार महिला काम करतात. त्यांपैकी तीन हजार महिला स्वत: भाजी ग्राहकांपर्यंत पोहोचवतात.

अभिनव महिला गटाची सुरुवात दररोज किंवा प्रतिमहिना कमीत कमी शंभर रुपये गोळा करावेत, अशा हेतूने हिंजवडी जवळच्या माण गावात २००७ मध्ये झाली. पूजा बोडके, अरुणा शेळके, अमृता तुपे, शांता डफळ, रुक्मिणी राक्षे, प्रिया बोडके, सीमा जाधव, सुवर्णा आणि सरिता बोडके, वंदना भेगडे, वंदना दाभाडे आणि त्यांच्या सहकारी अशा वीस जणींनी हे काम सुरू केले. पूजा बोडके या अध्यक्ष म्हणून, तर अरुणा शेळके सचिव म्हणून काम पाहतात. केवळ पैसे गोळा करणे एवढय़ावरच काम मर्यादित न ठेवता कामाचा विस्तार करण्याबाबत चर्चा करत असताना घरोघरी ताजी भाजी पुरवण्याच्या व्यवसायावर सगळ्या जणींचे एकमत झाले. जेवणात लोणचं, पापड नसेल तरी जेवण होऊ शकते, मात्र भाजीच नसेल तर जेवण होणार नाही. हे आहाराचे सूत्र ओळखून या वीस जणींनी कामाला प्रारंभ केला. भाजीबरोबरच इतर उत्पादनेही घ्यायची कल्पना त्यातूनच पुढे आली. परंतु, घरोघरी भाजी पुरवठय़ावरच जास्त भर देण्यात आला आहे. सुरुवातीला या व्यवसायात पुरुष मंडळी भाजी घरपोच करत असत. परंतु, या व्यवसायात मुख्य ग्राहक घरांमधील महिला असल्याने भाजी पोहोचवण्यासाठी महिलाच गेल्या तर.. अशी कल्पना ज्ञानेश्वर बोडके यांना सुचली. तसेच या व्यवसायात महिलांना खूप संधी आहे आणि या माध्यमातून जास्तीत जास्त महिला स्वावलंबी बनतील, हे सूत्र घेऊन बचत गटाच्या महिलांनी स्वत: घरोघरी जाऊन भाजी पोहोचवण्यास सुरुवात केली.

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत
Fire at Ichalkaranji Loom Factory
इचलकरंजीत यंत्रमाग कारखान्यास आग; १ कोटींचे नुकसान
Driver dies along with sibling after hitting tracks on negligently parked trailer solhapur
निष्काळजीपणे थांबलेल्या ट्रेलरवर ट्रॅक्स आदळून भाऊ-बहिणीसह चालकाचा मृत्यू

या व्यवसायाचाच एक भाग असलेल्या अभिनव फार्मसी क्लबतर्फे भाजीचा पुरवठा केला जातो. त्या क्लबला आर्थिक मदत मिळण्यासाठी नाबार्डच्या सुनील यादव या अधिकाऱ्याने मदत केली आणि त्यांना हे काम समजल्यानंतर त्यांनी स्वत:च्या कार्यालयातील अठरा कर्मचाऱ्यांसाठी भाजी पोहोचवण्याची पहिली मोठी ऑर्डर दिली. त्यानंतर या व्यवसायाने मागे वळून पाहिलेच नाही. अठरा ग्राहकांच्या पहिल्या ऑर्डरपासून आता दररोज साडेसात हजार ऑर्डपर्यंतचा टप्पा या व्यवसायाने गाठला आहे.

व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर मुळशीतील माण येथून पुणे आणि परिसरात येण्यासाठी टेम्पो चालकांचा मोठा प्रश्न होता. भाज्यांची मागणी घरगुती स्वरुपात असल्याने सकाळी लवकर घरी भाजी पोहोचवणे हे या व्यवसायापुढील मोठे आव्हान होते. चालक वेळेवर यायचे नाहीत, परिणामी माल पोहोचवण्यासाठी विलंब झाल्याने त्या दिवशीचा हक्काचा ग्राहक निघून जायचा. नवे चालक मिळायचे नाहीत. तसेच पुण्यात येण्यासाठी वाहतूककोंडीच्या समस्येलाही तोंड द्यावे लागायचे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी या महिलांनी स्वत:च्या घरातील मुला, मुलींनाच तयार केले. सध्या तब्बल तीन हजार मुली चालक म्हणून काम करतात आणि दोन हजार मुलगे ऑनलाइन ऑर्डर घेण्याचे काम करतात. सुरुवातीला व्यवसाय मर्यादित असल्याने भाडय़ाचे टेम्पो वापरण्यात येत असत. मात्र, टेम्पोचालक जास्त भाडे आकारत असत. राज्याचे तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे काम पाहून ५६ टेम्पो बचत गटाला दिले. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला आणि टेम्पोवर ‘अभिनव महिला बचत गट’ असे नाव लिहिल्याने बचत गटाची आपोआप जाहिरात होत गेली.

‘या व्यवसायाचा विस्तार होत असताना कामाचे अधिक चांगल्या पद्धतीने आणि योग्य नियोजन करण्यासाठी कामांची वाटणी करण्यात आली. वीस महिलांपैकी दोघी वगळता उर्वरित महिलांचे शिक्षण फारसे झालेले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष ग्राहकांशी संवाद साधताना शिकलेल्या महिलांना प्राधान्य देण्यात आले. अशाप्रमाणे कामांची वाटणी करण्यात आली. अरुणा शेळके यांच्याकडे विपणन, प्रिया बोडके यांच्याकडे उत्पादन घेऊन ते पॅकिंग करता देणे, रुक्मिणी राक्षे यांच्याकडे दुधाचे संकलन, अमृता तुपे यांच्याकडे परदेशी भाजीपाला गोळा करुन ग्राहकांपर्यंत पोहोचविणे अशाप्रकारे प्रत्येकीकडे काम वाटून दिल्याने पहिल्यापेक्षा अधिक आणि वेगाने कामे होत आहेत. महिलांना पॅकिंगसाठी रोज दोन ते अडीच तासांसाठी दोनशे ते तीनशे रुपये आणि दिवसभर काम करणाऱ्या महिलांना प्रतिदिन आठशे ते हजार रुपये मोबदला देण्यात येतो’, असे प्रिया सांगतात.

रोज येणाऱ्या भाजीच्या मागणीचा अंदाज घेऊन या व्यवसायाकडून उत्पादित होणारा आणि शेतकऱ्यांकडून येणारा माल (भाजी) रोज एकत्रित केला जातो. त्याची वर्गवारी करुन स्वच्छ करुन पॅकिंग केले जाते. ज्या भागात माल पोहोचवायचा आहे, त्यासाठी ठरलेल्या गाडय़ांमध्ये माल भरला जातो. भाज्या नाशवंत माल असल्याने त्याबाबत योग्य काळजी घेतली जाते. दररोज उत्पादित होणारा माल योग्य वेळी, योग्य ठिकाणी कटाक्षाने आणि वेळेवर पोहोचवला जातो.

या व्यवसायाचा आता चांगलाच विस्तार झाला असून मुळशी तालुक्यातील माण, घोटावडे, रिहे, चांदे, नांदे, पौड अशा गावांतून भाजीचे उत्पादन घेतले जाते. पुण्यातील एम्प्रेस गार्डन, बाणेर, बालेवाडी, औंध, कोथरुड, सांगवी, वाकड, नांदेड सिटी अशा ठिकाणी माल घरोघरी पोहोचवला जातो. काळाशी सुसंगत राहण्यासाठी ‘लोकाकार्ट’ या अ‍ॅपचा आधार घेण्यात आला असून त्या माध्यमातून आता ग्राहक आपली मागणी नोंदवतात.

या व्यवसायात भाजी खरेदी करणारे ९८ टक्के ग्राहक मध्यमवर्गीय नागरिक आहेत, हे विशेष. उर्वरित दोन ते तीन टक्के ग्राहक हॉटेल व्यावसायिक आहेत. सेंद्रिय शेती करुन उत्पादन घेऊन तो माल विकला जात असल्याने मालाची जाहिरात कधीच करावी लागली नाही. उत्तम प्रतीची भाजी दिली जात असल्याने या व्यवसायाने कधीही कोणत्याही प्रकारची जाहिरात केलेली नाही. एकाकडून दुसऱ्याकडे अशा ‘माउथ पब्लिसिटी’च्या जोरावर हा पल्ला गाठला आहे. या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा सिंचन सहयोग पुरस्कार २०१३ आणि २०१४ मध्ये, शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार २०१३ मध्ये आणि यशस्वी उद्योजक म्हणून प्रवीण मसाले उद्योग जननी पुरस्कार अशा पुरस्कारांनी या उद्योगाला गौरविण्यात आले आहे.