सेन्सॉर बोर्डाने काही दिवसांपूर्वी र्निबध घालण्यासाठी जाहीर केलेल्या आक्षेपार्ह शब्द आणि शिव्यांच्या यादीबद्दल अभिनेता अभिषेक बच्चन यानेही आपले मत व्यक्त केले आहे. ‘शासन जो निर्णय करेल त्याचे सर्व जण पालन करतीलच, पण कल्पकतेवर बंधने नकोत असे माझे वैयक्तिक मत आहे. ‘सर्टिफिकेशन’ जरुर असावे; ‘सेन्सॉरिंग’ नसावे,’ अशा शब्दांत अभिषेकने आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्विस घडय़ाळांच्या ‘ओमेगा’ या ब्रँडच्या पुण्यातल्या पहिल्या दुकानाचे अभिषेकच्या हस्ते महात्मा गांधी रस्ता येथे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. अभिषेक या घडय़ाळांचा ब्रँड अँबॅसडर आहे. उद्घाटनानंतर तो पत्रकारांशी बोलत होता. घडय़ाळांबद्दल अभिषेक म्हणाला, ‘‘मी गेल्या ९ वर्षांपासून या ब्रँडसाठी काम करतो आहे. या घडय़ाळांच्या उत्पादनात वापरले जाणारे नवीन तंत्रज्ञान मला आकर्षक वाटते.’’
‘आपले पुण्यात फारसे येणे होत नाही, पण पुणे खूप सुंदर शहर आहे,’ असेही अभिषेकने सांगितले. तो म्हणाला, ‘‘कामामुळे मला मुंबईतच राहावे लागले. त्यामुळे पुण्यात फार वेळा आलो नाही. सध्या मी उमेश शुक्ला दिग्दर्शित ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाचे नाशिकमध्ये चित्रीकरण करतो आहे. तिथून कालच पुण्यात आलो. इथला लष्कर भाग फारच सुंदर वाटला.’’
‘ऑल इज वेल’ चित्रपटात अभिषेकबरोबर अभिनेत्री असीन, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, सुप्रिया पाठक यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला,‘‘माझ्या भूमिकेत काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ऋषी कपूर याच्याबरोबरचा माझा हा दुसरा चित्रपट आहे. मी त्यांचा ‘फॅन’ आहे. या पूर्वी ‘दिल्ली- ६’ चित्रपटात आम्ही बरोबर होतो. अगदी लहानपणापासून मी त्यांना पाहात आलो आहे. त्यांच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळते.’’
क्रिकेट विश्वकरंडकाबद्दलही अभिषेकने अपेक्षा व्यक्त केल्या. तो म्हणाला, ‘‘भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा सामना खूपच छान झाला. सध्या तरी माझी परिस्थिती ‘फिंगर्स क्रॉस्ड’ अशी आहे! विश्वकरंडक आपल्याकडेच राहावा अशी अपेक्षा आहे.’’