राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका फेसबुक पोस्टवरुन त्या भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्य केल्याचं दिसत आहे. त्यांनी यासंदर्भात सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’ हीच भूमिका योग्य असल्याचे सांगितले आहे.
“मला असं वाटतं की, पंकजा मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचे ठाकरे कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. २०१४ मध्ये आम्ही जरी स्वतंत्र लढलो तरी देखील पंकजा मुंडे यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे राजकारणापलीकडचा देखील अनेक बाबतीमधला संवाद असू शकतो. आज ३ डिसेंबर आहे, १२ तारखेसाठी आणखी ९ दिवस बाकी आहेत. आपण ४८ तासांमध्ये काय, काय बदल होतात, हे पंधरा दिवसांत अनुभवलं आहे, त्यामुळे वेट अॅण्ड वॉच ही भूमिका योग्य राहील असं मला वाटतं.” असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि श्री दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी नारळाचे तोरण देखील अर्पण करण्यात आले. दरम्यान, त्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी देखील संवाद साधला.
नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतल्याने, सरकार आता दाऊदला देखील क्लीन चीट देईल, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, दाऊदला परत आणणे हे केंद्र सरकारचे काम असून राज्य सरकार याबाबत सर्व मदत करेल असे त्यांनी सांगितले. तर बुलेट ट्रेन किंवा नाणार या सारख्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा रोजगार हिरावून घेतला जात असेल आणि लोकांचा विरोध असेल, तर आढावा घेऊन अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, अशी संपूर्ण प्रकरणावर त्यांनी भूमिका मांडली.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याने, राज्यभरातील शिवसैनिकासह सर्व सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. ते सर्व सामान्य नागरिकाला न्याय देण्याचे काम करतील. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली भूमिका –
मी पक्ष सोडणार या निव्वळ अफवा आहेत. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला. मी खूप व्यथित आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आपण भाजपा सोडणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, पद मिळवण्यासाठी मी दबाव टाकत असल्याचा आरोपही संपूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगत, मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
First Published on December 3, 2019 6:20 pm