पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत धावत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी मध्यरात्री देखील अशीच एक घटना घडली असून चालत्या मोटारीला अचानक आग लागल्याने एका कुटुंबावर मोठे संकट ओढवले होते. मात्र, वेळीच प्रसंगावधान दाखवत यातून प्रवास करणाऱ्या कुटुंबातील तीन महिलांसह एका लहान मुलीला बाहेर काढण्यात यश आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मोटारीतून बडवाने कुटुंब एक कौटुंबिक कार्यक्रम उरकून पुण्याहून निगडीच्या दिशेने जात होते. तेव्हा, वेगात असणाऱ्या मोटारीला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, मोटार जळून खाक झाली. वेळीच प्रसंगवधान दाखवत कुटुंबातील तीन महिलांसह एका लहान मुलीला बडवाने यांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोटार मालक सतीश तुकाराम बडवाने (वय ६०) हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह पुण्याहून आपल्या निगडीतील घरी निघाले होते. मोटारीत ते स्वतः तीन महिला आणि एक लहान मुलगी असे पाच जण होते. मारुती सुझुकी कंपनीची ही मोटार धावत असताना बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला. त्यानंतर सतीश यांनी हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या समोर मोटार थांबवून प्रसंगवधाव दाखवत महिला आणि लहान मुलीला बाहेर काढले.

दरम्यान, तत्काळ मोटारीने मोठा पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचत राजाराम चौरे, राजेंद्र गवळी, लक्ष्मण होवाळे, अमोल चिपळूणकर, सरोप फुंदे, सदाशिव मोरे या अग्निशमनच्या जवानांनी कार्य सुरु केले आणि आग आटोक्यात आणली.