महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केल्यानंतर फरारी झालेल्या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी गजाआड केले. राजेंद्रनगर परिसरात रविवारी (एक एप्रिल) ही कारवाई करण्यात आली.
शुभम संभाजी गोळे (वय २०, गोळे आळी, पिरंगुट,ता.मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. तो गुंड शरद मोहोळ टोळीतील असून मोक्का कारवाई केल्यानंतर फरारी झाला होता. गोळे हा राजेंद्रनगर परिसरात येणार असल्याती माहिती पोलीस नाईक बाबा दांगडे यांना मिळाली. त्याआधारे सापळा रचून त्याला रविवारी ( एक एप्रिल) पकडण्यात आले. गोळे याच्याविरुद्ध अलंकार, हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत भट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस नाईक बाबा दांगडे, संजय बनसोडे, आनंद बाबर, हनुमंत गायकवाड यांनी ही कारवाई केली.