आर्थिक अनियमिततेमुळे प्रशासक नेमण्यात आलेल्या रुपी बँकेचे, सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला ‘सारस्वत’ च्या संचालक मंडळाने रविवारी मान्यता दिली आहे. त्यामुळे रुपीच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, आता याबाबतचा प्रस्ताव ‘सारस्वत’ कडून रिझव्र्ह बँकेला सादर करण्यात येईल.
रुपी बँक शंभर वर्षांपेक्षाही जुनी आहे. ती २००२ सालापासून अडचणीत आहे. त्या वर्षी रिझव्र्ह बँकेने आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन तिच्यावर प्रशासक नेमला होता. त्यानंतर निवडणुका होऊन पुढे नोव्हेंबर २००८ मध्ये नवे संचालक मंडळ अस्तित्वात आले. मात्र, त्यानंतर पुन्हा २१ फेब्रुवारी २०१३ रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून रिझव्र्ह बँकेने आर्थिक नियंत्रण आणले. तिच्यावर प्रशासक मंडळाची नेमणूक केली. खातेदारांना १००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मनाई केली होती.
त्यानंतर रुपीचे प्रशासनमंडळातील एक सदस्य विद्याधर अनास्कर यांनी बँकेचे सारस्वत बँकेत विलीनीकरण करण्याबाबत प्रस्ताव तयार केला. त्यासाठी विमा महामंडळाच्या मदतीची तरतूद आहे. त्यानुसार, रुपीच्या १ लाख रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या ठेवीदारांना, त्यांच्या एकूण रकमेपैकी ३५ टक्के रक्कम विमा महामंडळाकडून साहाय्य म्हणून सारस्वत बँकेला मिळेल. उरलेली ६५ टक्के रक्कम सारस्वत बँकेने त्यांच्या तरलतेमधून ठेवीदारांनी मागणी केल्यास द्यावयाची आहे. या प्रस्तावानंतर सारस्वत बँकेने दीड महिन्यांपूर्वी ‘रुपी’ची आर्थिक तपासणी करण्याकरिता एक स्वतंत्र पथक पाठवले होते. या पथकाने बँकेची संपूर्ण आर्थिक तपासणी केली व त्याचा अहवाल सारस्वत बँकेला सादर केला. त्यावर सारस्वत बँकेच्या संचालक मंडळाची रविवारी चर्चा झाली. त्यात रुपीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.
आता सारस्वत बँक आपला स्वतंत्र प्रस्ताव रिझव्र्ह बँकेकडे सादर करेल. तो रिझव्र्ह बँकेच्या विलीनीकरण समितीकडे जाईल. रिझव्र्ह बँकेच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया चार महिन्यांमध्ये पूर्ण होऊ शकते, अशी माहिती अनास्कर यांनी दिली.
‘रुपी’च्या ठेवीदारांना काय?
रुपी बँकेची स्थापना २१ नोव्हेंबर १९१२ रोजी झाली. तिच्या एकूण ठेवीदारांची संख्या ६ लाख २२ हजार ५४२ इतकी आहे, तर १४०९ कोटी ३७ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. बहुतांश ठेवीदार एक लाखापेक्षा कमी ठेवी असलेले आहेत. त्यांची संख्या ५ लाख ९५ हजार ९३५ इतकी आहे. त्यांच्या ठेवी ६९९ कोटी २४ लाख रुपयांच्या आहेत. उरलेले खातेदार एक लाखापेक्षा जास्त ठेवी असलेले आहेत. मात्र, त्यांच्या ठेवी ७१० कोटी १३ लाख रुपयांच्या ठेवी आहेत.
रुपी बँकेचे सारस्वत बँकेत विलीनीकरण झाल्यास, १. एक लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांसाठी- त्यांच्या इच्छेनुसार सर्व रक्कम काढता येईल किंवा सारस्वत बँकेत कायम ठेवता येईल. २. एक लाखापेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असलेल्या ठेवादारांसाठी- त्यांच्या ठेवींबाबत सारस्वत बँक रिझव्र्ह बँकला काय प्रस्ताव देते यावर ते अवलंबून असेल.
सारस्वत बँकेची स्थापना १९१८ साली झाली. या बँकेत २४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी आहेत.