तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली व पिंपरी महापालिकेने मागणी केलेली प्राधिकरणाची १४ हजार ७८४ चौरसमीटर जागा चालू निवासी दराने आकारणी करून महापालिकेला थेट वाटप करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
स्पाईन रस्ता विकसित करत असताना त्रिवेणीनगर चौकातील काही घरे बाधित होत आहेत. त्या घरांचे पुनर्वसन करावे, अशी जुनी मागणी आहे. प्राधिकरण व महापालिका प्रशासनाकडे यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला आहे. बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्राधिकरणाने जागा देण्याची मागणी महापालिकेने केली होती. त्यानुसार, मे २०१३ मध्ये प्राधिकरणाच्या सभेत १.४० हेक्टर जागेचे वाटप करण्यास सशर्त मान्यता देण्यात आली. पुढे शासनस्तरावर हा विषय बराच काळ प्रलंबित होता. अखेर, १९७३ च्या प्राधिकरण भूवाटप नियमानुसार, पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली व महापालिकेने मागणी केलेली प्राधिकरणाची १४ हजार ७८४ चौरसमीटर जागा निवासी दराने आकारणी करून महापालिकेस थेट वाटप करण्यास शासनाने मान्यता दिली. प्राधिकरणाचे मुख्याधिकारी यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडून आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली आहे.