05 July 2020

News Flash

नियंत्रण सुटलेल्या डंपरने घेतला सहा जणांचा बळी

चालकाचे नियंत्रण सुटलेल्या डंपरने गजबजलेल्या रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घालत सहा जणांचा बळी घेतला, तर चौघांना गंभीर रीत्या जखमी केले.

| June 12, 2015 03:22 am

चालकाचे नियंत्रण सुटलेल्या डंपरने गजबजलेल्या रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घालत सहा जणांचा बळी घेतला, तर चौघांना गंभीर रीत्या जखमी केले. मृतांमध्ये एकाच मोटारीतील चार जणांचा समावेश आहे. कात्रज-देहूरोड बाह्य़वळण मार्गावर वडगाव पुलाजवळ सकाळी आठच्या सुमारास हा अपघात घडला. वेगवेगळ्या दहा वाहनांना ठोकरल्यानंतर पुलावरून खाली पडल्यामुळे हा डंपर थांबला. अपघातानंतर डंपरचा11apghat1 चालक पळून गेला. संध्याकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता.
रवींद्र तुकाराम सावंत (वय ३५), सारिका रवींद्र सावंत (वय ३०), रेवती रवींद्र सावंत (वय १०, सर्व रा. मु. पो. सांगवी, ता. जावळी, जि. सातारा), सुभाष विनायक चौधरी (वय २९, रा. रामनगर, डोंबिवली), बालाजी तुकाराम राठोड (वय २५), महेंबर यादव गायकवाड (वय २३, रा. शिर्गापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांचा या अपघातात मृत्यू झाला. भालचंद्र विठ्ठल कालुरकर (वय ४२, रा. धनकवडी), रुपेश राजेंद्र पळसदेव (वय ३४, रा. धनकवडी), बाळासाहेब विठ्ठल घाडगे (वय ५६ रा. कोंढवा), शरद सर्जेराव मोरे (वय ५४, रा. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या डंपरवरील चालकाचे नऱ्हे पुलाजवळ नियंत्रण सुटल्याने भरधाव डंपरने सुरुवातीला एका प्रवासी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बसचालकाचेही नियंत्रण सुटले व बसने एका जीपला धडक दिली. त्यानंतर बस दुभाजकावर चढून पुढे एका झाडाला धडकून थांबली. दुसरीकडे डंपरची इतर वाहनांचा धडक देण्याचे सत्र सुरूच होते. बसच्या धडकेनंतर डंपरने एका तवेराला धडक दिली. त्यानंतर एका सहा आसनी रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षाचे दोन तुकडे झाले. पुढे डंपरने तीन दुचाकी व एका स्विफ्ट मोटारीलाही धडक दिली.
वाहनांना धडका देतच डंपर वडगाव पुलाजवळ आला. पुलाजवळ एक ओम्नी व सॅन्ट्रो मोटार उभी होती. ओम्नी रिकामी, तर सॅन्ट्रो मोटारीत पाच जण बसले होते. या दोन्ही मोटारींना डंपरने उडविले. त्यानंतर डंपरसह दोन्ही मोटारी वडगाव पुलाचा कठडा तोडून सेवा रस्ता व महामार्ग यांच्यामधील मोकळ्या जागेत पडल्या. मात्र, दोन्ही मोटारी डंपरखाली सापडल्या. या मोटारीतील चौघांचा मृत्यू झाला, तर त्यातील एक मुलगी बचावली. दुचाकींना दिलेल्या धडकेने एकाचा, तर रस्त्यालगत थांबलेल्या एकाचा या अपघातात मृत्यू झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोटारच्या पत्रे कापून मृतदेह व रचना सावंत (वय १४) या अपघातातून बचावलेल्या मुलीला बाहेर काढले. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. सुमारे तीन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2015 3:22 am

Web Title: accident death dumper katraj dehu road
टॅग Death
Next Stories
1 नामावली बदलण्याच्या आदेशामुळे एमपीएम, एमएमएम बंद होणार?
2 भीमाशंकरमध्ये १,९८५ शेकरू!
3 रेल्वेत नोकरी मिळाल्याचे सांगून फसवणूक करण्याचा प्रयत्न युवतीच्या सतर्कतेमुळे उघड
Just Now!
X