मुंबई- पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या सुमोचा लोणावळ्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ७ ते ७. ३० च्या सुमारास लोणावळा येथील कैवल्यधाम येथे घडली.
अधिक माहिती अशी, सकाळी मुंबईच्या दिशेने एक सुमो भरधाव निघाली होती. कैवल्यधाम येथे आल्यानंतर चालकाचा ताबा सुटला आणि सुमो डिव्हायडरला धडकून दोन रस्त्यांच्या मध्ये उभारलेल्या बागेची भिंत तोडून २५ फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात सुमोतील दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले. मृत व जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींवर निगडी येथील एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वीही अपघात झाला होता. परंतु त्यानंतरही कोणती उपाययोजना करण्यात आलेली नाही. याचसंदर्भात या रस्त्याचे काम पाहणाऱ्या कंपनीला सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.