मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता लोणावळ्याजवळील देवळे पुलाच्या खांबाला भरधाव मोटारीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला.

या अपघातात ओंकार प्रवीण मंचरकर (वय २३, रा. तानाजीवाडी, शिवाजीनगर), राजविरसिंग योगेंद्रसिंग ठाकूर (वय २७, रा. पाषाण), अजिंक्य कारखानीस (वय २४) आणि कुणाल संजय निगुडकर (वय २४, दोघेही रा. सांगवी) हे मृत्युमुखी पडले असून चालक इम्रान युनुस शेख (रा. कोंढवा) हा अपघातात जखमी झाला आहे. अतिशय वेगाने जात असलेल्या या मोटारीचे मोठे नुकसान झाले असून गाडीचे तुकडे इतस्तत: पडले होते. भरधाव जाणाऱ्या वाहनांना द्रुतगती मार्गावर सातत्याने अपघात होत असून द्रुतगतीवरील अपघातांची मालिका थांबत नसल्याचे चित्र या अपघाताने पुन्हा समोर आले आहे. गेल्या पंधरा दिवसात लोणावळा ते कामशेत दरम्यान झालेल्या तीन अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव येणारी मोटार (एमएच १२ एचझेड ५२४७) ही देवळे पुलाजवळ आली असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलाच्या खांबाला धडकून हा अपघात झाला. गेल्या काही दिवसात द्रुतगती मार्गावर झालेले अपघात ही चिंतेची बाब बनली आहे.