ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात या ट्रेलरने मोटार व एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला, तर एक महिला किरकोळ जखमी झाली. पुणे-बंगळुरु महामार्गावर नऱ्हे येथील उड्डाणपुलावर गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
मंदार पांडव (वय ३५, रा. वडगाव बुद्रूक) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातास कारणीभूत चालकास दत्तवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातग्रस्त ट्रेलर हा दोन स्कूलबस घेऊन साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने निघाला होता. कात्रज येथील नव्या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. उतार असल्याने ट्रेलरचा वेगही वाढला. त्यातच त्याने समोरून जात असलेल्या एका मोटारीला धडक दिली. जांभुळवाडी पूल पार करून तो पुढे नऱ्हे येथील पुलापर्यंत आला. पुलाची उजवीकडील बाजू रिकामी असल्याचे दिसल्याने त्याने ट्रेलर चुकीच्या बाजूने घातला. पुलाच्या कठडय़ाला धडकून चालकाने ट्रेलर थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मंदार याच्या दुचाकीला ट्रेलरची धडक बसली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकारात एक महिलाही जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.