गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघाती मृत्यूच्या प्रमाणात घट

गेल्या आठ महिन्यात शहरात १२३ प्राणांतिक अपघात झाले असून या अपघातांमध्ये १३२ वाहनचालकांचा मृत्यू झाला. प्राणांतिक अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या तुलनेने जास्त आहे. शहरात जानेवारी पासून हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर गंभीर तसेच प्राणंतिक अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत ऑगस्ट अखेरीपर्यंत शहरातील प्राणांतिक अपघातांच्या प्रमाणात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टच्या अखेरीपर्यंत शहरात १६० अपघात झाले होते. वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात १७० जणांना प्राण गमवावे लागले होते. शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत असून अपघातांचे प्रमाण वाढते आहे. जानेवारी महिन्यात शहरात हेल्मेट परिधान करणे  बंधनकारक करण्यात आले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाईऐवजी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाईचा वेग वाढविला आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांना सूचना दिल्या आहेत. ज्या भागात अपघातांचे प्रमाण (ब्लॅक स्पॉट) जास्त आहे, अशा भागांची पाहणी करून तेथे वाहतूक विषयक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिका तसेच अन्य यंत्रणांबरोबर संपर्क साधला असून या भागातील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मद्यपी वाहनचालकां विरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शहरात हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण वाढते आहे. हेल्मेट परिधान केल्याने गंभीर स्वरूपाच्या अपघातात दुचाकीस्वारांचे प्राण वाचले आहेत.

हेल्मेट सक्तीबरोबरच प्रबोधनही

वाहतूक पोलिसांनी गेल्या नऊ महिन्यांपासून हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई तीव्र केली आहे. हेल्मेट सक्तीबरोबरच वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी पोलिसांनी पोलीस मुख्यालयात खास समुपदेशन वर्गाचे आयोजन केले होते. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिसांनी वेळोवेळी उपक्रम राबविले.