‘‘तरूण मुलांना मी डॉ. मनमोहन सिंग यांची खिल्ली उडवताना पाहायचो. माझी मुलगीही मला सिंग यांच्याविषयी मोबाईलवर फिरणारे विनोद वाचून दाखवायची. सिंग म्हणजे सोनिया गांधी यांच्या हातचं बाहुलं आहेत, ते पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत, असा या विनोदांचा आशय असायचा. ते सारे पाहून मला वाटले की सिंग यांचे राष्ट्रबांधणीत असलेले योगदान लिखित स्वरूपात असायला हवे..’’ डॉ. मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकामागील प्रेरणा उलगडली आणि सिंग यांच्या अंतरंगावरही प्रकाश टाकला.
बारू यांनी लिहिलेल्या या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लीला सोहोनी यांनी केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन मेहता पब्लिकेशनतर्फे सोमवारी बारू यांच्याच हस्ते करण्यात आले; या वेळी ते बोलत होते. माजी सनदी अधिकारी राम प्रधान, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, प्रकाशक सुनील मेहता या वेळी उपस्थित होते.
बारू म्हणाले, ‘‘तरूणांना भेटल्यावर त्यांना डॉ. सिंग यांची खिल्ली उडवताना बघायचो. तेव्हाच सिंग यांच्या योगदानाविषयी लिहावे असे वाटले. त्यांच्या ढासळल्या गेलेल्या प्रतिमेविषयीचे तीव्र दु:ख यामागे होते. २००४ मध्ये सिंग अपघाताने पंतप्रधान झाले. त्यानंतर २००९ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सिंग यांचे कर्तृत्व मतदारांना दाखवून पुन्हा सत्ता मिळण्याची अपेक्षा बाळगली आणि ती पूर्ण झाली. त्यानंतर मात्र सिंग ते राहुल गांधी या बदलाचे धोरण काँग्रेसने ठेवले. तीच सिंग यांच्या शेवटाची सुरूवात ठरली.’’
‘राजकारणाविषयी नागरिकांना आकर्षण असले तरी त्यात पडद्यामागे बरेच काही घडत असल्यामुळे फारसे काही बाहेर येत नाही. त्यामुळे बारू यांच्या या आठवणी ऐतिहासिक दस्तऐवज ठरतील,’ असे प्रधान यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सिंग यांचे व्यक्तिमत्त्व हा या पुस्तकाचा गाभा आहे. ते अतिशय बुद्धिमान तर आहेतच पण प्रशासक म्हणूनही ते चांगले आहेत. परंतु निर्णय घेऊ न शकणे हे त्यांचे एकमेव वैगुण्य आहे.’’