मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांबरोबरच वाहनांच्या स्थितीकडे लक्ष देणेही गरजेचे ठरत आहे. गेल्या आठवडय़ात द्रुतगती मार्गावर लागोपाठ झालेल्या अपघातांची माहिती महामार्ग पोलिसांनी संकलित केली असता वाहनचालकांची क्षुल्लक चूक तसेच बेफाम वेग जिवावर बेतल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ९४ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर वाहतुकीत अडथळा येत नाही. त्यामुळे वाहनचालक सुसाट वेगाने जातात. अशावेळी वाहनांची वेगमर्यादा तसेच वाहनांची स्थिती विचारात घेणे गरजेचे आहे. प्रवास करण्यापूर्वी वाहनाची पुरेशी देखभाल करण्यात आली आहे का नाही, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. अवजड वाहनचालकांकडून वाहनांची देखभाल, दुरुस्ती केली जाते. तशाच पद्धतीने कामानिमित्त किंवा एखाद्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी जात असलेल्या मोटारचालकांनी देखील मोटारीची दुरुस्ती, देखभालीकडे काणाडोळा करता कामा नये, असे निरीक्षण महामार्ग पोलिस दलाचे पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी नोंदविले.

दुपदरी रस्त्यावरुन वाहन चालवणे आणि द्रुतगती मार्गावरुन वाहने चालविणे यात फरक आहे, याची जाणीव वाहनचालकांनी ठेवणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी आसनपट्टा बांधावा तसेच वाहन सुरू करण्यापूर्वी यांत्रिक चाचपणीही करावी. प्रतिकिलोमीटर शंभरपेक्षा जास्त वेग ठेवू नये, तसेच डाव्या बाजूने वाहन पुढे नेऊ नये. भरधाव वेग आणि डाव्या बाजूने वाहन नेण्याच्या प्रयत्नात गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. द्रुतगती मार्गावर भरधाव वेगाामुळे टायर फुटतात. प्रवास सुरू करण्यापूर्वी टायरमधील हवेचा दाब तपासून घेणे गरजेचे आहे. सध्या टायरमधील हवा भरण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो. नायट्रोजनमुळे टायर फुटण्याची शक्यता अतिशय कमी असते. टायर फुटल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात घडतात.

द्रुतगती मार्गाचा वापर करणाऱ्या मोटारचालकांनी थकवा आल्यास वाहन फुडमॉलजवळ थांबवावे. परराज्यातून येणाऱ्या अवजड वाहनचालकांनी विश्रांती घेण्यासाठी ट्रक थांब्यावर (ट्रक टर्मिनल) ट्रक लावावा. पुरेशी विश्रांती घ्यावी आणि त्यानंतर प्रवास सुरू करावा. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. मोटार किंवा अवजड वाहने चालविणाऱ्यांना डुलकी लागते. त्यामुळे अपघात घडतात.

– मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस पुणे विभाग

पुणे-मुंबई-पुणे असे दुहेरी अंतर ३०० किलोमीटर आहे. सलग प्रवास केल्याने वाहनचालकांवर ताण येतो. थकव्यामुळे वाहनचालकांना झोप येते. पुरेशी झोप न मिळाल्याने डुलकी लागते आणि काही सेकंदात वाहनचालकाचे नियंत्रण सुटते. अशा प्रकारचे अपघात पहाटे आणि मध्यरात्री होतात. चालकांनी टप्प्याटप्प्याने वाहन चालवावे, सहचालकाची मदत घ्यावी, डोळ्यावर झोप असेल तर वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवून झोप घ्यावी. चहा, कॉफी सारखी पेये घ्यावीत. वाहनचालकांनी मद्यपान अजिबात करु नये.

– डॉ. सत्यजित वाढेकर, संचालक, आपत्कालीन मदत केंद्र (ट्रामा सेंटर)