29 October 2020

News Flash

अधिकाऱ्यांच्या परस्पर निर्णयाने गोंधळ

नव्या आदेशानुसार पेट्रोल सर्व नागरिकांना उपलब्ध

संग्रहित छायाचित्र

पेट्रोलच्या मुद्दय़ावरून समन्वयाचा अभाव स्पष्ट; नव्या आदेशानुसार पेट्रोल सर्व नागरिकांना उपलब्ध

पुणे : शहर सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करीत असताना प्रशासकीय पातळीवर मात्र विविध बाबतीत परस्परविरोधी आणि गोंधळ निर्माण करणारे निर्णय घेतले जात आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतरत्र काही दुकाने त्याचप्रमाणे ग्रामीण विभागात उद्योग सुरू करताना पेट्रोलही उपलब्ध करून देण्याच्या निमित्ताने अधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव पुन्हा स्पष्ट झाला आहे. पालिका आयुक्तांनी पेट्रोल सर्वाना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असताना लगेचच जिल्हाधिकाऱ्यांनी विरोधी आदेश काढला. मात्र, सकाळपर्यंत याबाबत गोंधळात भर पडल्याने काही तासांतच निर्णय फिरवून पेट्रोल सर्वासाठी खुले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.

टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर पेट्रोलच्या वितरणावर मर्यादा आणण्यात आल्या होत्या. अत्यावश्यक सेवेत किंवा जीवनावश्यक वाहतुकीत असलेल्या वाहनांसाठीच पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध करून देण्यात येत होते. त्यासाठी संबंधितांकडील ओळखपत्र किंवा प्रमाणित कागदपत्राची तपासणीही केली जात होती. या नागरिकांशिवाय इतरांना इंधन दिल्यास पंप चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना सकाळी दहा दे दुपारी दोन यावेळेत इंधन मिळत होते.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागामध्ये जीवनावश्यकसह इतर दुकाने तीन दिवसांपासून सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काही भागांतील उद्योगही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.

त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही इंधनाची आवश्यकता असल्याने ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी ही बाब पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. शहरातील निर्णयाची जबाबदारी पालिका आयुक्तांवर असल्याने त्यांनी पेट्रोलपंपधारकांशी झालेल्या चर्चेत सर्वासाठी पेट्रोल उपलब्धतेचा निर्णय ४ मे रोजी घेतला. मात्र, त्याच दिवशी पोलीस आयुक्तांनी ट्वीट केले. कुणालाही पेट्रोल दिल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.

जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यावर कडी करीत स्वतंत्र आदेश काढला. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील नागरिक आणि परवानगी दिलेल्यांनाच इंधन द्यावे आणि त्यासाठी ओळखपत्रांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या निराळ्याच आदेशाने पंपचालकही चक्रावून गेले. ही बाब पालिका आयुक्तांच्याही लक्षात आणून देण्यात आली. त्यानंतर चोवीस तासांच्या आत ६ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा नवा आदेश काढून पेट्रोल सर्वाना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

पेट्रोलपंप सकाळी ७ ते संध्याकाळी ७ खुले

समन्वयाच्या अभावामुळे परस्परविरोधी निर्णयांनंतर पेट्रोलच्या वितरणाबाबत बुधवारी शेवटचा आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी- चिंचवड शहर, जिल्हा, नगरपालिका, नगरपंचायत तसेच पुणे, खडकी आणि देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सर्व नागरिकांसाठी पेट्रोल उपलब्ध केले जाणार आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत पेट्रोल पंप उघडे राहतील. पेट्रोलसाठी आता पंपचालकांकडून कोणत्याही ओळखपत्राची मागणी केली जाणार नाही.

इतर व्यवसायांसाठी परवानगी देण्याचा निर्णय ; संभ्रमावस्थेमुळे पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद

पिंपरी : जीवनाश्यक वस्तूंशिवाय इतर व्यावसायिकांची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया पिंपरी महापालिकेने सुरू केली असून व्यावसायिकांकडून अर्ज मागवण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, याविषयी संभ्रमावस्थेमुळे बुधवारी, पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मिठाई, बेकरी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, हार्डवेअर, चष्म्याचे दुकान, लहान मुलांच्या कपडय़ांचे दुकान, मोबाइल कंपन्यांची दालने, गॅरेज आदी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रभाग (क्षेत्रीय) कार्यालय स्तरावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना  आहे. प्राधान्यक्रमाचा निकष ठेवून आणि पूर्णपणे खबरदारी बाळगण्याच्या अटीवर परवानगी दिली जाणार आहे. मात्र, पानटपरी, चहाची दुकाने, व्यापारी संकुले, मॉल, बाजारपेठा सुरू करण्यास बंदी कायम राहणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील २१ प्रतिबंध क्षेत्र वगळता इतर भागातील नागरी वसाहतीत अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त दुकाने सुरू करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. व्यावसायिकांनी  क्षेत्रीय कार्यालयातून परवानगी प्राप्त करून घ्यावी, या महापालिकेच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

दरम्यान, नागरिकांनी गर्दी करू नये, सुरक्षित अंतर राखावे, मास्क घालावा यासारख्या आवश्यक नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौर माई ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 1:16 am

Web Title: according to the new order petrol is available to all citizens in pune zws 70
Next Stories
1 टाळेबंदीत सायबर चोरटे सक्रिय
2 कामगार, विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्य़ांमध्ये नेण्यासाठी एसटी सज्ज
3 Coronavirus : पाच कारणांमुळे पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण
Just Now!
X