17 December 2018

News Flash

कोथरूडमधील व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणातील आरोपींना ‘मोक्का’

पिस्तुलाचा धाक दाखवून पन्नास लाखांची खंडणी मागण्यात आली होती.

प्रातिनिधिक छायाचित्र

कोथरूड भागातील व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी गुंड संतोष ऊर्फ लुब्या चांदीलकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच  पिंपरीतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी चांदीलकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांकडून ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी संतोष ऊर्फ लुब्या चिंतामण चांदीलकर (वय ३६, रा. लवळे, ता. मुळशी), मनजीत ऊर्फ आबा मानसिंग सावंत (वय २६, रा. काळमवाडी, ता. वाळवा, जि. सांगली), शशीकांत ऊर्फ पप्पू मच्छिंद्र कुंभार (वय २८, रा. सत्यसाईनगर, बांदलवाडी, ता. बारामती) यांच्याविरुद्ध ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार मयूर बाळासाहेब गोळे हा पसार झाला आहे. कोथरूड भागात राहणारे व्यावसायिक प्रदीप बाफना यांचे पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळ भागातून अपहरण करण्यात आले होते.

त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून पन्नास लाखांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. चांदीलकर आणि त्याच्या साथीदारांना सांगली भागात सापळा लावून पकडण्यात आले होते.

चांदीलकरविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी अपहरण असे गंभीर स्वरूपाचे ३१ गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, सहायक निरीक्षक सुनील गवळी, विठ्ठल शेलार, अविनाश मराठे, सुधीर इंगळे, प्रमोद मगर, मंगेश पवार, हनुमंत गायकवाड, धीरज भोर, रमेश गरुड, शिवाजी घुले, सचिन अहिवळे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. चांदीलकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सहायक आयुक्त समीर शेख करत आहेत.

First Published on November 15, 2017 2:31 am

Web Title: accused booked under mcoca for kidnapping businessman in kothrud