पुणे मुंबई महामार्गावर दरोडा आणि लूटमार करणाऱ्या आरोपीने पोलीस स्थानकात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अविनाश खंडागळे असे या आरोपीच नाव असून तळेगाव पोलिसांनी त्याला अटक केली होती. ही घटना पहाटे घडली आहे.

देहूरोड पोलीस स्थानकाच्या तुरुंगात आरोपी अविनाशने आत्महत्येचा प्रयत्न केला. पहाटे अविनाशने चादरीच्या दोऱ्याच्या सहाय्याने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत असणारे आणखी पाच आरोपी गाढ झोपेत होते. त्याचदरम्यान वीज गेल्यावर अविनाशने गळफास घेतला. हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. सध्या आरोपीची परिस्थिती गंभीर आहे.

द्रुतगती मार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा तळेगाव पोलिसांनी तीन तासात पर्दाफाश केला होता. अविनाश हा त्याच टोळीचा सदस्य आहे. त्याच्यावर बुलढाणा आणि अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यासोबत अटक करण्यात आलेल्या आरोपींवर बुलडाणा आणि अहमदनगरमध्ये बलात्कार, दरोडा आणि अवैध शस्त्र विक्रीचे पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी अविनाशने गळफास का घेतला यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.