आपल्याकडे १३ आकडा अशुभ मानला जातो, पण मराठीतील वेगवेगळय़ा संमेलनांचे तेरा संमेलनाध्यक्ष १३ जून रोजी प्रथमच एका व्यासपीठावर येत आहेत. आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानने संमेलनाध्यक्षांचे संमेलन असा योग जुळवून आणला आहे.

मराठी भाषेमध्ये वर्षभरात जवळपास दीडशे ते दोनशे साहित्यसंमेलने होत असतात. त्यापैकी १३ प्रातिनिधिक संमेलनांच्या अध्यक्षांना प्रतिष्ठानने निमंत्रित केले असून, ते सर्व जण उपस्थित राहणार आहेत. आचार्य अत्रे यांच्या ४७व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ११ ते १३ जून या कालावधीत लकाकि रस्त्यावरील विनोद विद्यापीठ येथे साहित्यसम्राट आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्व साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, मराठवाडा विभागीय साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष दत्ता भगत, अखिल भारतीय मराठी मुस्लीम साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष शफाअत खान, अस्मितादर्श मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष रविचंद्र हडसनकर, कोकण मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार, सम्यक साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, अखिल भारतीय मराठी संत साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष बद्रिनाथमहाराज तनपुरे, विद्रोही साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष राम पुनियानी आणि मराठवाडा लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा वृषाली किन्हाळकर असे १३ संमेलनाध्यक्ष अत्रे यांच्या स्मृतिदिनी १३ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संमेलनाध्यक्षांचा सत्कार होणार आहे.