करोनाचा संसर्गामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले असताना मुळशीतील ताम्हिणी घाट, पौड परिसरात वर्षाविहारासाठी आलेल्या ९५ जणांवर कारवाई करण्यात आली. पौड पोलिसांनी आदेश धुडकावल्याप्रकरणी पुणे, पिंपरीतील या पर्यटकांवर भादंवि कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वर्षाविहारासाठी पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण परिसर, मावळ, लोणावळा, खंडाळा भागात पुणे तसेच मुंबईतील पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी उच्चांकी गर्दी होती. रविवारी (५ जुलै) मुळशीत पर्यटनासाठी आलेल्या ९० जणांवर कारवाई करण्यात आली. गेल्या रविवारीदेखील पर्यटकांवर कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती पौड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे यांनी दिली.

मुळशी धरणाचे पाणलोट, ताम्हिणी घाट, पळसे गाव परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांनी तीन ठिकाणी तपासणी नाके सुरु केले आहेत. भूगाव, माले गाव, लवासा रस्त्यावर पौड पोलिसांनी तपासणी नाके उभे केले आहेत. रविवारी (५ जुलै) पोलिसांनी तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी केली. मुळशीत प्रवेश करणाऱ्या पर्यटकांना तेथून माघारी पाठविण्यात आले, असे लवटे यांनी सांगितले.

काहीजणांकडून बतावणी

पोलिसांनी मुळशीत आलेल्यांची तपासणी केली तेव्हा काहींनी मुळशीत बंगला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता अनेकांनी बतावणी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपासणी नाक्यावर पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना ध्वनिवर्धकावरुन परतण्याचे आवाहन केले.