मंडळ तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरविणाऱ्यांचे धाबे दणाणले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेची धडकी भरवणारी ध्वनिवर्धक यंत्रणा (डीजे) जप्त करण्याची तसेच कोणत्याही परिस्थितीत ध्वनिवर्धक यंत्रणा वाजू न देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर पुणे पोलिसांकडून डीजेंवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी ध्वनिप्रदूषण कायद्याअंतर्गत तसेच पोलिसांचा आदेश धुडकाविल्याचे कलम वापरून कारवाई करण्यात येत होती. आता मात्र पोलिसांनी थेट ध्वनिवर्धक यंत्रणेवर घाला घातल्याने मंडळ तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरविणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला वैभवशाली परंपरा आहे. विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळे उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक यंत्रणा वापरतात. धडकी भरवणाऱ्या ध्वनिवर्धक यंत्रणेमुळे सामान्यांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. विसर्जन मिरवणुकीत वापरली जाणारी ध्वनिवर्धक यंत्रणा उच्च क्षमतेची असते. शंभर डेसिबलपेक्षा जास्त आवाज या यंत्रणेतून निर्माण होतो. विसर्जन मिरवणुकीत लाखो रुपये मोजून मुंबई, चेन्नई, बंगळुरु, दिल्ली, गोवा, हैदराबाद येथील नामांकित ध्वनिवर्धक यंत्रणा पुरविणाऱ्या व्यावसायिकांकडून खास यंत्रणा मागविली जाते. ध्वनिवर्धक यंत्रणेत मिक्सर, ध्वनिवर्धक (टॉप, बेस) वापरले जातात. खास रॉक शोसाठी वापरली जाणारी यंत्रणा विसर्जन मिरवणुकीत वापरली जाते. हीच यंत्रणा तीस फुटांच्या रस्त्यांवर वाजवली जाते.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे पोलिसांनी ध्वनिवर्धक यंत्रणेवर कारवाई सुरू केली आहे. चंदननगर, हडपसर तसेच कोथरूड भागातून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ध्वनिवर्धक यंत्रे, ध्वनिवर्धक जप्त करण्यात आले आहेत.

ध्वनिवर्धक  कारवाई आणि गुन्हे

चंदननगर पोलीस ठाणे- ४ गुन्हे

हडपसर पोलीस ठाणे- २ गुन्हे

कोथरूड पोलीस ठाणे – ध्वनिप्रदूषण कायद्याचे ३ खटले

जप्त साहित्य- ८ अ‍ॅम्लिफायर (मिक्सर)

यंत्रांचे वाटप

विसर्जन मिरवणुकीत कारवाई करण्यासाठी शहरातील पोलीस ठाण्यांना ध्वनीच्या तीव्रतेची मोजणी करणाऱ्या १४७ यंत्रांचे (डेसिबल मीटर) वाटप करण्यात आले आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action from the police on dj in ganesh immersion procession
First published on: 22-09-2018 at 04:05 IST