मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाढलेल्या अपघातांची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ िशदे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या मार्गावरील धोकादायक ठिकाणे व मार्गिका तोडण्याच्या प्रकारांची तसेच अतिवेगाने चालवल्या जाणाऱ्या वाहनांची पाहणी गुरुवारी केली. या मार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश महामार्ग पोलीस व सर्व संबंधित यंत्रणांना शिंदे आणि रावते यांनी दिले आहेत.

पोलिसांना देण्यात आलेल्या आदेशानुसार वेग मर्यादेचा भंग करणाऱ्या १२६ वाहनांवर गुरुवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली तर २० वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईबाबत एकनाथ िशदे आणि रावते यांनी माहिती दिली. द्रुतगती मार्गावरील वाढलेले अपघात व नियमांचा भंग याची शासनाने गंभीर दखली घेतली असून द्रुतगती मार्गावरील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मुख्यमंत्री यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही या मार्गाची पाहणी केली. द्रुतगती मार्गावर वेग मर्यादा ताशी ८० किमी असताना मार्गावर १२० ते १६० किमी वेगाने वाहने नेली जात आहेत. अशा वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर सहा ठिकाणी विशेष कारवाई पथके नेमण्यात आली असून ही पथके वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर आणि मार्गिका तोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करतील, असे यावेळी सांगण्यात आले. लोधिवली पूल, खालापूर टोलनाका व उस्रे टोलनाका येथे शिंदे आणि रावते यांनी भेट देऊन पोलिसांकडून कारवाईची माहिती घेतली.

जाळ्यांची पाहणी नाही!

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सर्वाधिक अपघात व वाहतूक कोंडीची समस्या खंडाळा घाटात होते. तसेच गेल्या वर्षी खंडाळा घाट व आडोशी बोगदा परिसरात दरडी पडण्याच्या घटनांमुळे डोंगराला जाळ्या लावण्याचे काम वर्षभर सुरू होते. गेल्या आठवडय़ात हे काम पूर्ण झाले आहे. मंत्र्यांनी हे काम कसे झाले आहे तसेच या भागात अपघात कशामुळे होतात, काय उपाययोजना कराव्या लागतील,

याची पाहणी करणे अपेक्षित असताना मंत्र्यांचा ताफा घाटात न थांबल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.