आधार नोंदणी, दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या केंद्रांवर कारवाई; चार अटकेत

आधार दुरुस्तीकरिता अतिरिक्त शुल्क आकारणे, आधार नोंदणी करण्याकरिता कागदपत्रांची शहानिशा न करणे, बोगस आधार कार्ड काढून देणे आदींचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने ३३ यंत्रचालकांना काळ्या यादीत टाकले आहे. तर, चार जणांना अटक करण्यात आली आहे. आधार नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसून आधार दुरुस्तीकरिता नियमाप्रमाणे पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून शहरासह जिल्ह्य़ात आधार केंद्रे ठप्प झाली आहेत. जेवढी केंद्रे सुरू आहेत. त्यांपैकी काही आधार केंद्रांवर सामान्य नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. तसेच कागदपत्रांची शहानिशा न करता पैसे घेऊन आधार कार्ड देण्याचेही प्रकार समोर आले आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

चाकण येथील आधार केंद्रावर अतिरिक्त शुल्क घेत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली होती. या केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून एक व्यक्ती आधारचे काम करण्यासाठी पाठविण्यात आली. संबंधित व्यक्तीकडून अतिरिक्त शुल्क घेताना धाड टाकून चार जणांना अटक करण्यात आली आहे. खेड प्रांत आयुष प्रसाद आणि चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ही कारवाई केली आहे. शहरासह जिल्ह्य़ात कोणत्याही आधार केंद्रावर नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क घेत असल्यास संबंधित केंद्र आणि केंद्र चालकांवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, जिल्ह्य़ात ‘एक आधार केंद्र – एक यंत्र’ या प्रमाणे पुणे महापालिका कार्यक्षेत्रात ८४, पिंपरी-चिंचवड महापालिका ४९ आणि उर्वरित जिल्ह्य़ातील भागात ६३ केंद्रे अशी एकूण १९६ आधार केंद्र सुरू आहेत. शहरात शिक्षण विभागाकडून (महापालिका शाळांमध्ये) १७, क्षेत्रीय कार्यालयांत ६, बँकांमध्ये ११, पोस्ट ऑफिस आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) यांच्या कार्यालयात दहा यंत्रे कार्यरत असल्याची माहिती तहसीलदार आणि आधारचे नोडल अधिकारी विकास भालेराव यांनी दिली. शहरासह जिल्ह्य़ातील कोणती आधार केंद्रे सुरू आहेत. याबाबत माहिती पाहण्यासाठी ‘यूआयडीएआय डॉट जीओव्ही डॉट इन’ संकेतस्थळावर जाऊन ‘लोकेट एन्रोलमेन्ट अ‍ॅण्ड अपडेट सेन्टर्स’ या पर्यायावर गेल्यास आधार केंद्रांची माहिती मिळू शकेल.

टपाल, बीएसएनएल कार्यालयांमधील आधार केंद्रे

* बीएसएनएल- बाजीराव रस्ता (शुक्रवार पेठ), चिंचवड पोस्ट कार्यालयाजवळ (चिंचवड), पंचमी होटेलजवळ (सातारा रस्ता), मॉडेल कॉलनी (शिवाजीनगर), हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, धनकवडी पोस्ट कार्यालयाजवळ (धनकवडी), गोल्फ क्लब विमानतळ रस्ता (येरवडा), सीटीओ कम्पाउंड मुख्य पोस्ट कार्यालय (पुणे स्टेशन), भोसरी टेलिफोन एक्स्चेंज (भोसरी).

* टपाल कार्यालये- सिटी पोस्ट (लक्ष्मी रस्ता), मुख्य पोस्ट कार्यालय (पुणे स्टेशन), जंगली महाराज रस्ता (शिवाजीनगर), चिंचवड पूर्व (पुणे-मुंबई रस्ता), पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट (पर्वती पायथा), जुना पुणे-मुंबई रस्ता (पिंपरी).