गैरव्यवहारांच्या आरोपांनंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांचे संकेत

महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहारांच्या पाश्र्वभूमीवर सल्लागार कंपनीवर सातत्याने आरोप होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर सल्लागार कंपनीकडून खुलासा मागविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. संबंधित कंपनीकडून खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे संकेत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले.

समान पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेसह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी या कंपनीच्या कारभाराबाबत शंका व्यक्त करीत आरोप केले आहेत. समान पाणीपुरवठा योजनेच्या जुन्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहारांची अद्याप चौकशी झालेली नाही. जुनी निविदा या कंपनीकडून करण्यात आली होती. आरोप झाल्यानंतरही या कंपनीलाच पुन्हा नव्याने निविदा तयार करण्याचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिका आयुक्तांच्या या निर्णयावरूनही जोरदार टीका झाली होती. कंपनीच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोपही त्यामुळे सुरू झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या खास सभेतही त्याचे पडसाद उमटले. काँग्रेसकडून या संदर्भातील खुलाशाची मागणी करण्यात आली. सल्लागार कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात महापालिका आयुक्त यांनी खुलासा केला.

‘समान पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१२ मध्ये सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तीन वर्षांनंतर योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) तयार करण्यात आला. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली मात्र काही कारणास्तव ती रद्द करावी लागली. सल्लागार कंपनीच्या कामकाजाबाबत आणि कथित गैरव्यवहारांच्या पाश्र्वभूमीवर कंपनीकडून खुलासा मागविण्यात आला आहे. हा खुलासा मिळाल्यानंतर सल्लागार कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगतिले.