हेल्मेटसक्तीच्या कारवाईतून पोलिसांना मुभा देण्यात आली नाही. गेल्या काही दिवसांत सामान्य वाहनचालकांबरोबर हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई झाली आहे. या कारवाईचा बडगा बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारात एका महिला सहायक पोलीस निरीक्षकावर उगारण्यात आला. पत्रकारांनी या घटनेचे छायाचित्र काढल्यानंतर त्या महिला अधिकाऱ्याने पत्रकारांनाच धारेवर धरले आणि थेट गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
हेल्मेटसक्तीबाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी भाष्य केल्यानंतर पुण्यात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईला विरोध झाला आणि सर्वपक्षीय आंदोलन झाले. परंतु हेल्मेट न वापरणाऱ्या  दुचाकीस्वारांबरोबर पोलिसांवरही कारवाई करण्यात येत असून बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयात आलेल्या महिला सहायक निरीक्षकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्या वेळी महिला अधिकाऱ्यासोबत तिचे पती होते.
पत्रकारांनी मोबाइलवरून या घटनेचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिला अधिकारी संतप्त झाल्या आणि तिच्या पतीने पत्रकारांचे मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या महिला अधिकाऱ्याने पत्रकारांना विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पत्रकार या घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्याकडे गेले. हे समजताच महिला अधिकारी आणि तिच्या पतीने तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, ती महिला अधिकारी सिंहगड पोलीस ठाण्यात नियुक्तीस असल्याचे समजते.
या घटनेची माहिती पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना देण्यात आली. पोलीस आयुक्त पाठक म्हणाले, की कारवाईचे छायाचित्र काढण्यात काही गैर नाही. त्या महिला सहायक निरीक्षकाची माहिती  आम्ही घेणार आहोत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.