१५० जणांवर बडगा; दंडात्मक कारवाईऐवजी न्यायालयात खटले दाखल

शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास न्यायालयाने बंदी घातली असली तरी अनेक पानपट्टीचालक आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मनाई आदेश धुडकावून तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री के ली जात असल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून, गेल्या दोन महिन्यांत दीडशे जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी संपूर्ण वर्षभरात अमली पदार्थ विरोधी पथकाडून दीडशे खटले दाखल करण्यात आले होते. यंदा कारवाईचा वेग वाढवला आहे, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाकडून देण्यात आली. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात काही किराणामाल विक्रेत्यांकडून तंबाखू मिक्सची विक्री केली जात आहे. तंबाखू मिक्सचे व्यसन अनेक शाळकरी मुले करतात. शंभर मीटरच्या अंतरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे, मात्र अनेक दुकानदार नियम धाब्यावर बसवून तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटची विक्री करत आहेत. शहराच्या मध्यभागातील अनेक शाळांच्या परिसरात टपरीवजा दुकानांत सर्रास तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे ही टपरीवजा दुकाने शाळेच्या प्रवेशद्वारापासून शंभर मीटरच्या अंतरात आहेत.

या बाबत अनेक पालकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दीडशे जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे हा गुन्हा अदखलपात्र गुन्हय़ांच्या स्वरूपात मोडतो. तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांकडून दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्याची तरतूद आहे, मात्र अमली पदार्थ विरोधी पथकाकडून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्यांच्याविरुद्ध रीतसर न्यायालयात खटले दाखल करण्यात येत आहेत. न्यायालयात खटले दाखल केल्यामुळे अशा विक्रेत्यांवर जरब बसेल, असे अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

महाविद्यालयीन तरुण हुक्का पार्लरमध्ये जातात. हुक्का पार्लरवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शहरातील ८१ हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनांना बळी पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाकडून शाळा, महाविद्यालयाच्या आवारात जनजागरण मोहीम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तंबाखूजन्य पदार्थाची विक्री कारवाई

वर्ष                 दाखल खटले

२०१७               १५०

२०१८                १५०

(जानेवारी ते मार्च दरम्यान करण्यात आलेली कारवाई)