News Flash

कचऱ्याबाबतची बेफिकिरी भोवली

शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.

कचऱ्याबाबतची बेफिकिरी भोवली
(संग्रहित छायाचित्र)

ओला कचऱ्याची विल्हेवाट न लावणाऱ्या सोसायटय़ांवर कारवाई सुरू

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ओला कचरा न जिरविणाऱ्या सोसायटय़ा, बंगले, रुग्णालये, नर्सिग होम, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मंगल कार्यालये आदींवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार हडपसर-मुंढवा परिसरातील तीन सोसायटय़ांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नागरी घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम २०१६ अन्वये प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण करणाऱ्या विविध अस्थापनांना त्यांच्याच आवारात हा कचरा कंपोस्टिंग, बायोमिथनायझेशन आणि अन्य तंत्रज्ञानाद्वारे जिरविणे बंधनकारक आहे. शंभर किलो कचरा निर्माण करणाऱ्या मात्र तो न जिरविणाऱ्या सोसायटय़ा, बंगले, रुग्णालये, नर्सिग होम्स, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, हॉटेल्स, मंगल कार्यालये, खासगी कंपन्यांना पालिकेने नोटीसा बजाविल्या होत्या. ओला कचरा जिरविण्यासाठी १५ मार्च २०१९ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र वेळोवेळी संधी देऊनही बल्क वेस्ट कंपोस्टिंग, बायोमिथनायझेशन वा अन्य तंत्रज्ञानाचा वापर होत नसल्याचे आढळून आल्यामुळे आता कारवाई सुरू करण्यात आली आहे.

शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विविध उपाययोजनांतर्गत घरे, सोसायटय़ा, शाळा, हॉटेल्स तसेच विविध संस्था व कंपन्यांच्या हद्दीमध्ये ओला कचरा कसा जिरविला जाईल, याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचा वेळोवेळी आढावाही घेण्यात येत आहे. प्रक्रिया प्रकल्पांना चालना मिळावी, यासाठी गांडूळखत प्रकल्प, पाणी पुनर्भरण योजना राबविणाऱ्या सोसायटय़ांना मिळकत करात पाच ते दहा टक्क्य़ांची सूट आहे.

नवीन तंत्रज्ञान निश्चित

कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे आणि सोसायटय़ांमधील ओला कचरा सोसायटय़ांमध्येच जिरविणे बंधनकारक करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर सोसायटय़ा, गृहप्रकल्पांच्या आवारात राबविण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांना चालना देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी ४५ प्रकारचे तंत्रज्ञान निश्चित करण्यात आले आहे. आदर्श प्रकल्प राबविणाऱ्या सोसायटय़ांची यादीही संकलित करण्यात येत आहे. कोणत्या प्रकल्पांना कोणत्या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे, याची यादीही तयार करण्यात आली असून त्याचे शहराच्या विविध भागात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

हडपसर, मुंढवा परिसरातील तीन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३० हजार रुये दंड वसूल केला आहे. ओल्या कचऱ्याची योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावणाऱ्या मोठय़ा आस्थापनांवर यापुढे कारवाई केली येईल.

– ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 12:25 am

Web Title: action on the society not disposing of wet wastes
Next Stories
1 धार्मिक सेवांसाठी ‘गुरुजी ऑन डिमांड’ संकेतस्थळ विकसित
2 फोनवर कुणाशी बोलतेस विचारणाऱ्या पतीवर चाकूने वार ; पत्नीला अटक
3 पावसाच्या शक्यतेपूर्वी पुणेकर घामाघूम
Just Now!
X