क्लोचिंग क्लासला प्रवेश घेताना इंग्रजी भाषेतून शिकवण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात इंग्रजी भाषेत न शिकवता सदोष सेवा देणाऱ्या विद्यासागर क्लासेसला ग्राहक मंचाने विद्यार्थिनीकडून घेतलेली रक्कम परत करण्याचा आदेश दिला आहे. नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असे मंचाने आदेशात म्हटले आहे.
या प्रकरणी विधी केतन वखारिया या विद्यार्थिनीचे वडील केतन कीर्तिकुमार वखारिया (रा. श्रेयस अपार्टमेन्ट, गणेशखिंड रस्ता) यांनी विद्यासागर क्लासेस (पत्ता- घोले रस्ता, शिवाजीनगर) यांच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. वखारिया यांनी  आपली मुलगी विधी ही दहावी पास झाल्यानंतर पुढील प्रवेश परीक्षेच्या वर्गासाठी विद्यासागर क्लासेसकडे चौकशी केली. वखारिया यांच्या मुलीचे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झालेले होते. त्यामुळे विद्यासागर क्लासेसमधील शिकवणेसुद्धा इंग्रजी भाषेतून असेल तर तिला ते सोपे जाणार होते. त्याबाबत क्लासेसला विचारल्यानंतर त्यांनी इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचे मान्य केले होते. त्यामुळे वखारिया यांनी ८८ हजार ७९२ रुपये क्लासेसकडे भरून प्रवेश घेतला. त्यानंतर काही दिवसांमध्ये वर्ग सुरू झाल्यानंतर विधी ही क्लासेसला जाऊ लागली. मात्र, वर्गामध्ये इंग्रजी भाषेत न शिकवल्यामुळे तिला अभ्यासक्रम समजून घेण्यास अडचण येऊ लागली. त्याबाबत तिने क्लासेसला सांगितले. पण, तिच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही म्हणून वखारिया यांनी क्लासेसकडे भरलेले पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र, क्लासच्या धोरणानुसार पैसे परत देता येणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. म्हणून वखारियांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली.
ग्राहक मंचाकडे तक्रार आल्यानंतर मंचाकडून विद्यासागर क्लासेसला नोटीस पाठविण्यात आली. मात्र, क्लासेसकडून मंचासमोर कोणीही उपस्थित राहिले नाही. क्लासमध्ये इंग्रजी भाषेत शिकविण्याचे मान्य केल्यामुळे प्रवेश घेतला. मात्र, क्लासकडून प्रत्यक्षात इंग्रजीत न शिकविण्यात आल्यामुळे अभ्यासक्रम समजून घेताना अडचण आली. त्यामुळे क्लास सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. क्लासकडून सेवेत त्रुटी राहिल्याचे स्पष्ट करत मंचाने तक्रारदार यांनी क्लासला प्रवेश घेताना भरलेल्या रकमेपैकी दोन हजार अॅडमिशन शुल्क वगळून इतर रक्कम परत करावी. त्याबरोबरच नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात यांनी दिला आहे.