राज्य निर्मल करण्यासाठी पुढील दहा वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, दहा हजार चारशे कोटींच्या या आराखडय़ास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांनी दिली.
वारीच्या काळामध्ये ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने आयोजित स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीची सुरुवात बुधवारी सोपल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव मल्लिनाथ कलशेट्टी, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे त्या वेळी उपस्थित होते.
सोपल म्हणाले, केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘निर्मल भारत’ योजनेअंतर्गत राज्याच्या स्वच्छतेचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यातील २७ हजार ९०२ गावांपैकी ९ हजार ५२३ गावे निर्मल झाली आहेत. या वर्षांमध्ये ३ हजार ५०० गावे या योजनेसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पुढील काळात १४ हजार ८७९ गावांमध्ये स्वच्छतेचे काम करायचे आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या आराखडय़ाला केंद्राने मान्यता दिली आहे. त्यानुसार वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची उभारणी, घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन, जगजागृती आदी कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. चालू वर्षांसाठी ६०० कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडय़ानुसार दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, दारिद्र्यरेषेवरील अल्पभूधारक, भूमिहीन शेतकरी, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, कुटुंबप्रमुख महिला असलेली कुटुंब, अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी मोठय़ा गावांमध्ये प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने बायोगॅस, गांडूळ खत, वर्मीकल्चर इत्यादी प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे.
स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीबाबत ते म्हणाले, वारीमुळे पाच लाखांहून अधिक वारकरी सहभागी होतात. त्यांच्यापर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याच्या दृष्टीने या दिंडय़ांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून स्वच्छतेबरोबरच ग्रामसभेचे बळकटीकरण त्याचप्रमाणे कुपोषण टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात प्रत्येकी आठ कलापथकांचा समावेश करण्यात आला आहे. विविध जिल्ह्य़ांचे चित्ररथही सोहळ्यात सहभागी होणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने दिंडी प्रमुखांना औषधांचे कीट व त्याची माहितीही देण्यात आली आहे.