मोनिका सिंह

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शहरासह जिल्ह्य़ात लागू झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची निवडणूक तयारीची लगबग सुरू आहे. यंदा प्रथमच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांचा निवडणुकीत वापर होणार असल्याने आणि पुणे शहरासह जिल्ह्य़ातील मतदारांची संख्या ७३ लाखांपेक्षा अधिक असल्याने जिल्हा प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्याशी केलेली बातचीत.

*    निवडणुकीबाबत जिल्हा प्रशासनाकडून तयारी कशी सुरू आहे?

पुणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदार संघांपैकी पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघांसाठी तिसऱ्या, तर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघांसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. पुणे, बारामतीसाठी येत्या २८ मार्चपासून, तर मावळ, शिरूरसाठी २ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शासकीय विभागांचे प्रमुख, पोलीस प्रशासन यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठकही पार पडली आहे. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प अशा सुविधा देण्यात येणार आहेत. निवडणूक विषयक विविध कामांसाठी पथके स्थापन करण्यात येत असून त्यामध्ये खर्च देखरेख, छायाचित्रणकार, निरीक्षक, विभागीय अधिकारी, भरारी पथके, स्थिर पथके (एसएसटी), निवडणूक केंद्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी व्हिडीओ चित्रीकरण आणि पाहणी पथक, लेखा पथक नियुक्त करण्यात येत आहे. एनजीआरएस सिस्टीम ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सैन्यात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्मिटेड पोस्टल बॅलेट सव्‍‌र्हिस) यंदा नव्याने उपलब्ध होणार आहे.

*    सी-व्हिजिल अ‍ॅपबद्दल काय सांगाल?

आचारसंहिता भंगाच्या नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे. या अ‍ॅपचा वापर निवडणूक अधिसूचनांच्या तारखेपासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. तक्रारींचे छायाचित्र किंवा व्हिडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. या अ‍ॅपद्वारे तक्रारदार आपली ओळख लपवूनही तक्रार करू शकणार आहे. अ‍ॅपचा दुरुपयोग टाळण्यासाठी छायाचित्र किंवा व्हिडिओला क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यांला केवळ पाच मिनिटांचाच अवधी मिळणार आहे. पूर्वी रेकॉर्ड केलेली छायाचित्रे किंवा व्हिडिओ अपलोड करता येणार नाहीत. याबरोबरच नागरिकांना तक्रारी नोंदवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य संकेतस्थळाचा वापर करता येईल. तसेच राज्य संपर्क केंद्रावर १९५० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

*    विशेष मतदार नोंदणीला कसा प्रतिसाद मिळाला?

जिल्हा निवडणूक शाखेकडून ३१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार मतदारांची संख्या ७३ लाख ६९ हजार १४१ एवढी आहे. त्यानंतर २३ आणि २४ फेब्रुवारी, तसेच २ आणि ३ मार्च रोजी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमध्ये अनुक्रमे १५ हजार ४०२ आणि २७ हजार ४०२ असे एकूण ४२ हजार ८०४ अर्ज नावनोंदणीसाठी प्राप्त झाले. याबरोबरच निवडणूक शाखेकडे २५ हजार १९६ अर्ज ऑनलाइन आले आहेत. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने एकूण (ऑनलाइन-ऑफलाइन) ६८ हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे विशेष मतदार नोंदणीला शहर, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्य़ात चांगला प्रतिसाद मिळाला.

*    गृहनिर्माण संस्थांकडून मतदार नोंदणीबाबत कसा प्रतिसाद होता?

मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांची मतदार म्हणून नोंदणी, दुबार व मयत नावे वगळणे आणि अर्जामधील दुरुस्ती अशी कामे या स्वयंसेवकांकडून करण्यात आली. नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची मदत झाली.

*    निवडणूक शाखेकडून मतदान जागरूकता कशाप्रकारे करण्यात येणार आहे?

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेकडून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांच्या तयारीचा आणि मतदारांमधील जागरूकतेसंबंधी जे कार्यक्रम राबवले जाणार आहेत, त्याचा आढावा घेण्यात येत आहे. मतदान जनजागृती मोहीम, मतदान संकल्प पत्र वितरण, शाळा आणि महाविद्यालयात इलेक्टोरल लिटरसी क्लबची स्थापना, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, संस्थांमध्ये मतदार साक्षरता मंचाची स्थापना, ग्रामपंचायत स्तरावर चुनाव पाठशालांचे आयोजन आदी उपक्रम केले जाणार आहेत.

दृक्-श्राव्य माध्यमांचा वापर करून निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रचार करणे, दिव्यांग मतदारांचा शोध घेणे, दिव्यांग मतदारांची नोंदणी, दिव्यांग मतदारांना मतदानाप्रसंगी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी

(१)  http://electoralsearch.in

(२) http://www.ceo.maharashtra.gov.in

(३) http://www.nvsp.in

ही संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संकेतस्थळावर जाऊन, त्यावर मतदाराने आपले नाव, वडील किंवा पतीचे नाव, आडनाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर संबंधित मतदाराचे नाव यादीमध्ये आहे किंवा कसे, हे समजू शकेल. या बरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे ‘व्होटर हेल्पलाइन’ नावाचे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातूनही मतदार यादीतील नावाची माहिती मिळवता येईल.

मुलाखत – प्रथमेश गोडबोले