अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि डाव्या व आंबेडकरवादी 24fergussion3विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या वादात राजकीय पक्षांनीही उडी घेतल्यानंतर या वादाला बुधवारी हिंसक वळण लागले. भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), अभाविप, पतित पावन संघटना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, आंबेडकरवादी संघटना या वेळी एकमेकाला भिडल्या. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी पिस्तूल काढले. याप्रकरणी अडीचशे ते तीनशे अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अभाविपचा नेता आलोक सिंग याच्या अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम अभाविपच्या कार्यकर्त्यांनी फग्र्युसन महाविद्यालयात मंगळवारी ठेवला होता. त्या वेळी आंबेडकरवादी संघटना आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महाविद्यालयातील परिस्थिती आटोक्यात आली. या वादाला बुधवारी दुपारनंतर मात्र हिंसक वळण लागले.
आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 24fergussion1आमदार जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसह फग्र्युसन महाविद्यालयांत आले. त्या वेळी अभाविप, भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्याविरोधी घोषणा दिल्या. या सगळ्या प्रकाराचे संदेश छायाचित्रांसह समाजमाध्यमांतून झपाटय़ाने पसरले आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते महाविद्यालयाच्या आवारात दाखल झाले. संघटनांमधील वाद त्यानंतर अधिकच चिघळला. या वेळी आव्हाड यांना धक्काबुक्की करण्यात आली, दगडफेकीचे प्रकारही कार्यकर्त्यांकडून घडले. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. या वेळी पोलिसांनी पिस्तूल काढल्यामुळे वाद वाढवण्यात त्याचीही भर पडली. याप्रकरणी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न, सार्वजनिक शांततेचा भंग, मारहाण अशा आरोपांखाली २५० ते ३०० कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परिस्थिती आवाक्याबाहेर जात असल्याचे दिसल्यामुळे पिस्तूल बाहेर काढले. सुरक्षेच्या कारणासाठी तसेच जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. भाजपच्या कार्यकर्त्यांना आव्हाड यांच्या दिशेने न जाण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी ऐकले नाही.
– प्रवीण चौगुले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे</strong>

संघटनांमधील कुरबुरी आणि तणाव कायम
महाविद्यालयांना गुरूवारी होळीची सुटी होती. तरीही संघटनांमधील कुरबुरी आणि तणाव कायमच होता. फग्र्युसन महाविद्यालयांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तविद्या विभागातील काही विद्यार्थ्यांनी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून जिवाला धोका असल्याची तक्रार डेक्कन पोलिस ठाण्यात दिली. याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. ‘कन्हैय्या कुमारला पुण्यात बोलावल्यास ठोकून काढू,’ अशी धमकी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दिली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

महाविद्यालयाच्या उलट-सुलट पत्रांनी गोंधळ
आलोक सिंग याच्या गप्पांच्या कार्यक्रमाला परवानगी कशी मिळाली या मूळ मुद्दय़ावरून हा वाद सुरू झाला. महाविद्यालयात मंगळवारी झालेल्या घोषणाबाजीनंतर ‘महाविद्यालयाच्या प्राचार्याची परवानगी न घेता एकत्र होऊन विद्यार्थी समूहाने काही देशविरोधी घोषणा दिल्या. अशा प्रकारे एकत्र जमून देशविरोधी घोषणा देणाऱ्या व्यक्तींवर त्वरित कारवाई करावी,’ अशा आशयाचे पत्र प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात दिले होते. मात्र काही वेळात ते पत्र मागे घेऊन प्राचार्यानी ‘देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास कारवाई करावी,’ असे पत्र दिले. आधीच्या पत्रात काही शब्द प्रिंट झाले नसल्याचे स्पष्टीकरण महाविद्यालयाकडून देण्यात आले. मात्र, त्यानंतर दिलेली ही दोन्ही पत्रे मागे घेत असल्याचे प्राचार्याकडून डेक्कन पोलिस ठाण्याला गुरुवारी आणखी एक पत्र देऊन कळवण्यात आले.

समाज माध्यमांवर भडकवणारे संदेश
या सगळ्या नाटय़ाच्या पहिल्या घोषणाबाजीच्या अंकानंतर लगेचच समाज माध्यमांवर झाल्याप्रकारावर संदेश फिरू लागले. संघटनांचे परस्पर विरोधी संदेश, व्हिडीओ व्हायरल झाले. त्याचेही पडसाद बुधवारी आणि गुरूवारी उमटले.