पं. भीससेन जोशी, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, पं. रविशंकर, उस्ताद अहमद जान थिरकवाँ अशा दिग्गज कलावंतांची ओळख पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या तोंडून ऐकण्याची आणि भारतातील विख्यात कलावंतांवरील चित्रफिती पाहण्याची संधी ‘कलावंतांच्या मुखातून कलावंतांची ओळख’ या आगळ्या कार्यक्रमातून पुणेकरांना मिळणार आहे. सहकारनगरमधील पं. भीमसेन जोशी कलादालनात हा आगळा प्रयोग साकारला असून त्याचा प्रारंभ गुरुवार (२१ मे) पासून होईल.
महापालिकेने चार वर्षांपूर्वी बांधलेल्या पं. भीमसेन जोशी कलादालनात भारतीय संगीताचा इतिहास उलगडून दाखवणारे दालन यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे. याच कलादालनात आता ‘कलावंतांच्या मुखातून कलावंतांची ओळख’ हा प्रयोग साकारला आहे. या आगळ्या वेगळ्या प्रयोगात भारतीय संगीताच्या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी केलेल्या कलावंतांची ओळख पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी करून दिली आहे. गार्डियन मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रयोग साकारला असून त्यासाठी महापालिकेला १७ लाख रुपये एवढा खर्च आला आहे. उपमहापौर आबा बागूल यांची ही संकल्पना आहे.
या प्रयोगासाठी पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे साडेतीन फूट उंचीचे पुतळे तयार करण्यात आले असून हे कलाकार पं. भीससेन जोशी, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, पं. रविशंकर, उस्ताद अहमद जान थिरकवाँ यांच्या संगीत कारकिर्दीबद्दल आणि त्या त्या कलावंताच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती देतात. हे कलाकार जेव्हा माहिती देतात त्यासाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे त्या तंत्रज्ञानामुळे, दोन्ही पुतळे बोलत असल्याचा, प्रत्यक्ष माहिती देत असल्याचा भास प्रेक्षकांना होतो, इतके उत्तम तंत्रज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात आले आहे. या कलाकारांनी माहिती दिल्यानंतर प्रत्यक्ष पडद्यावर त्या त्या कलाकारावर तयार करण्यात आलेली चित्रफीत दाखवण्यात येते.
या प्रयोगासाठी पं. भीससेन जोशी, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, पं. रविशंकर, उस्ताद अहमद जान थिरकवाँ अशा दिग्गज कलावंतांची ओळख करून देण्यासाठी पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी मन:पूर्वक सहकार्य केले असून त्यांनी त्यांच्या मुलाखती चित्रित करण्यासाठीही पूर्ण सहकार्य केले आहे. कार्यक्रमाचे निवेदन आनंद देशमुख यांचे आहे. अध्र्या तासाचा हा कार्यक्रम असून पं. भीमसेन जोशी कलादालन, तसेच संगीत कारंजे व अन्य सेवा-सुविधांसाठी जे वीस रुपये तिकीट आकारले जाते त्याच तिकिटात हा प्रयोग प्रेक्षकांना दाखवला जाणार असल्याची माहिती उपमहापौर आबा बागूल यांनी दिली.