पैसे कसेही मिळवता येतात. मात्र, पैशासाठी आजपर्यंत मी स्वत:ला विकलेले नाही. ‘सुपाऱ्या’ घेतल्या नाहीत, यापुढेही घेणार नाही, असे स्पष्ट मत नाटय़-सिनेअभिनेता प्रशांत दामले याने चिंचवड येथे व्यक्त केले.
चिंचवडच्या शिशिर व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी राजन लाखे यांनी प्रशांतची मुलाखत घेतली, तेव्हा कलाकारांच्या ‘सुपारी’ व्यवसायावर प्रशांतने अप्रत्यक्ष टीका केली. प्रशांत म्हणाला, सतत तोटा होऊ लागल्याने ‘प्रीतिसंगम’ नाटक बंद करावे लागले. ‘नकळत घडले सारे’च्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदानासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले. जवळपास एक लाख नागरिकांचे अर्ज भरून घेतले, त्याचे मोठे समाधान आहे. कलाकाराने सर्व काही पैशासाठी न करता कर्तव्य म्हणून काही गोष्टी करायला हव्यात. त्यातील समाधानही महत्त्वाचे आहे. ‘सुपाऱ्या’ घेऊन पैसे मिळवण्याची वेळ आपल्यावर आली नाही. खिशात पैसे आले की शिकण्याची इच्छा कमी होते. मात्र, उपाशी पोटी चांगले काम होते. अभिनय शिकवता येत नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या पातळीवर अभिनय करतच असतो. घरातल्या बायका आपला अभिनय ओळखण्यात तरबेज असतात. नाटकांच्या दौऱ्यांमुळे आपण व्यग्र राहात होतो, तेव्हा पत्नीने घर सांभाळले. आई आणि बाबा या दोन्ही भूमिका समर्थपणे निभावल्या. तारखा लक्षात नाही म्हणून अनेकदा ‘कल्लोळ’ झाला आहे. ‘आम्ही सारे खवैय्ये’ च्या माध्यमातून काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. शेवग्याच्या शेंगांच्या सालीची भजी खाण्याचा भन्नाट अनुभव त्याने सांगितला. ‘सांगा कसं जगायचं’ या गाण्याचा मुखडा गाऊन प्रशांतने मुलाखतीचा समारोप केला.