गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याचा धाक नाही; मराठा समाजाचे मोर्चे उत्स्फूर्त

दोन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपमध्ये सध्या तीव्र अस्वस्थता असून पक्षात मोठय़ा प्रमाणात असंतोष खदखदतो आहे, असे सांगत गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींना पोलिसांचा कसलाही धाक राहिला नाही, हेच कोपर्डी व नगरसारख्या घटनांमधून पुढे आले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी िपपरीत पत्रकारांशी बोलताना केली. राज्यभरात ठिकठिकाणी मराठी समाजाचे लाखोंचे मोर्चे निघणारे मोर्चे उत्स्फूर्त आहेत, असेही ते म्हणाले.

मंत्रीपद सोडावे लागलेल्या एकनाथ खडसे यांनी वाढदिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तेव्हा त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. जे खडसे यांच्या मनात आहे, तेच माझ्या मनात असल्याचे विधान करत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही खडसेंच्या सूरात सूर मिसळला. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, दोन वर्ष सत्तेत असल्याने भाजपमध्येही अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे.

काही जण पक्षाच्या चौकटीत, चार भिंतीच्या आत आपले म्हणणे मांडत असतात. मात्र, तसे करूनही न्याय मिळाला नाही, तेव्हाच जाहीरपणे बोलण्याची वेळ एखाद्यावर येते. बहुजनांचा पक्ष म्हणून भाजपची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच सत्तेत आल्यानंतर पक्ष विसरला, अशी भावना पक्षाचे नेते उघडपणे मांडत आहेत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ भाजपवर आली आहे. मुख्यमंत्री पक्षाचे नसतात, ते राज्याचे असतात.

मात्र, पक्षातील घडामोडींची दखल त्यांना घ्यावी लागते. आघाडी सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या पक्षाकडे गृहखाते होते. मात्र, भाजपने ते स्वत:कडे ठेवले. राज्यभरात अन्याय व अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. नगर किंवा कोपर्डीतील घटना पाहता पोलिसांची भीती राहिली नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. उत्सवात वर्गणीची सक्ती होत आहे, कारण पोलिसांचा दरारा राहिला नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करणे राज्यकर्त्यांना शक्य असते.

मात्र, तसे होताना दिसत नाही. सरकारच्या दृष्टीने अडचणीचे विषय आल्यास वेगळ्या विदर्भासारखे विषय काढून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते. राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाचे लाखोंचा सहभाग असणारे मोर्चे निघत आहेत. ते कोणीही आयोजित केलेले नाहीत. गरीब-श्रीमंत, सुशिक्षित, मध्यमवर्गीय, महिला, युवक असे सर्वच त्यात सहभागी होत आहेत. समाज अस्वस्थ असला की तो गप्प बसत नाही. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये.

‘लक्ष्मण जगताप रंग बदलणाऱ्या सरडय़ासारखे’

राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांचा नामोल्लेख टाळून अजित पवार यांनी त्यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. निष्ठा नसणारी व उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी काही माणसे असतात. असे जे पक्ष सोडून गेले, ते स्वार्थी होते. इतकी वर्षे त्यांना भरभरून दिले, तरी ते मला सोडून जाऊ शकतात. उद्या भाजपचे वाईट दिवस आल्यास त्यांनाही सोडून जातील. कारण, सरडय़ाप्रमाणे रंग बदलणारी त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांचे स्वारस्य टीडीआर आणि आर्थिक ताकद वाढवण्यातच आहे.