फेऱ्या पाच हजाराने वाढल्या; गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ

पुणे : शहरामध्ये पाणीटंचाई नसल्याचा नसल्याचा दावा महापालिका आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत असला, तरी वाढलेल्या टँकरच्या फेऱ्यांमुळे शहराच्या विविध भागांमध्ये पाणीटंचाई असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात शहरात टँकरच्या १७ हजार ९०६ फेऱ्या झाल्या होत्या. यंदा त्यात पाच हजार ११९ फेऱ्यांनी वाढ झाली असून मार्चमधील टँकरच्या फेऱ्यांची संख्या २३ हजार २५ एवढी झाली आहे. महापालिकेने मार्च महिन्यापर्यंतची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार पाणीटंचाईमुळे टँकरच्या फेऱ्यात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा पाणीसाठा कमी असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीने घेतला होता. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणानेही शहराच्या पाण्यात कपात करण्याचे आदेश दिले होते. मात्र शहरात कोणतीही कपात नसल्याचा आणि पाणीटंचाई जाणवत नसल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला होता. महापालिकेच्या आकडेवारीवरूनच हा दावा फोल ठरला आहे.

खराडी, औंध, बाणेर, बालेवाडी, वडगावशेरी, विमाननगर, खराडी, धानोरी, कळस, लोहगाव, एनआयबीएम रस्ता या परिसरात टँकरच्या फेऱ्या वाढल्या असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. विस्कळीत स्वरूपात पाणीपुरवठा होत असलेल्या आणि पाण्याची मागणी येणाऱ्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने खासगी टँक र घेतले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्यात येतो. टँकरच्या संख्येत वाढ झाली नसली, तरी फेऱ्यांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात टँकरच्या १७ हजार ९०६  फेऱ्या झाल्या होत्या. त्यात वाढ होऊन ही संख्या यंदा मार्च महिना अखेपर्यंत २३ हजार २५ पर्यंत पोहोचली आहे.

खडकवासला साखळी प्रकल्पात पाणी कमी असल्यामुळे शहराच्या दैनंदिन पाणीपुरवठय़ामध्ये प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर (एमएलडी) कपात करण्यात आली होती. त्यानंतर सर्व भागांना किमान पाच तास पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने पाणीपुरवठय़ाचे सुधारित वेळापत्रक तयार केले होते. त्यानंतरही पाणीपुरवठय़ाच्या अनेक तक्रारी सातत्याने झाल्या होत्या. पण पाणीटंचाई नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता.

महिना-वर्ष          टँकरच्या फेऱ्या

ऑक्टोबर २०१८-१९        २०,३०९

नोव्हेंबर २०१८-१९           १७,७९४

डिसेंबर २०१८-१९          १९,३९१

जानेवारी २०१८-१९           १९,६३९

फेब्रुवारी २०१८-१९          १८,६३८

मार्च २०१८-१९                 २३,०२५