करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमधील मांजरी येथे बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनीही या आगीसंदर्भात पहिली प्रतिक्रिया देताना नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. मात्र नुकसानीपेक्षा कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत किंवा जीवितहानी न होणे हे अधिक महत्वाचं असल्याचंही म्हटलं आहे.

अनेकांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागल्यानंतर व्यक्त केलेल्या चिंतेबद्दल आणि काळजीबद्दल अदर पूनावाला यांनी आभारही मानले आहेत. “तुम्ही व्यक्त केलेली चिंता आणि प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार. आतापर्यंत सर्वात महत्वाची गोष्टी म्हणजे या आगीमुळे काही मजले जळून खाक झाले असले तरी कोणतीही जिवितहानी अथवा गंभीर दुखापत कोणालाही झालेली नाही,” असं ट्विट अदर पूनावाला यांनी केलं आहे.

तर एनडीटीव्हीशी बोलताना अदर पूनावाला यांनी आगीत किती नुकसान झालं याची तपासणी आम्ही नंतर करु सध्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याला आमचं प्राधान्य आहे, असं स्पष्ट केलं आहे. पुण्यात असणारी ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ ही संस्था सध्या जगातील सर्वात मोठी करोना लस निर्माण करणारी संस्था आहे. या संस्थेत तयार झालेल्या कोविड -१९ प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीचा पहिल्या टप्प्यातील साठा १२ जानेवारी रोजी दिल्लीसहीत इतर शहरांमध्ये पोहोचवण्यात आला. १२ जानेवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास करोना लसींचा पहिला साठा पुण्यातून पाठविण्यात आला.  तो काही तासांतच विमानाने दिल्लीसहीत इतर शहरांमध्ये पोहोचण्यात आला होता. देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे.